‘धुरंधर’च्या वादळात चाहत्यांना मिळणार नॉस्टॅल्जियाचा डोस! रणवीर अनुष्काच्या ‘बँड बाजा बारात’ची होणार एन्ट्री; कधी होणार रिलीज?
या री-रिलीजमुळे चाहत्यांना रणवीर- अनुष्काची केमिस्ट्री पुन्हा अनुभवता येणार आहे.

Band Baja Barat: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असतानाच, बॉलिवूडमधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (Band Baja baarat re-release) रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांची सुपरहिट जोडी असलेला ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या री-रिलीजमुळे चाहत्यांना रणवीर- अनुष्काची केमिस्ट्री पुन्हा अनुभवता येणार आहे.
‘बँड बाजा बारात’च्या री-रिलीजची अधिकृत घोषणा पीव्हीआर सिनेमाजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की बॉलिवूडमधील लोकप्रिय रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘बँड बाजा बारात’ पुन्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवणार आणि मनोरंजन करणार आहे.
कधी होणार ‘बँड बाजा बारात’ री-रिलीज?
‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट 16 जानेवारीपासून पीव्हीआर आणि आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चित्रपटातील धमाल म्युझिक, हलकीफुलकी कथा आणि रणवीर- अनुष्काची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
काय आहे ‘बँड बाजा बारात’ची कथा?
2010 साली प्रदर्शित झालेला ‘बँड बाजा बारात’ हा रणवीर सिंहच्या अभिनय कारकिर्दीचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं होतं. रणवीर सिंहने या चित्रपटात बिट्टू शर्मा ही भूमिका साकारली होती, जो लग्नसमारंभ आयोजनाचा व्यवसाय सुरू करतो. तर अनुष्का शर्माने श्रुती कक्कड ही महत्त्वाकांक्षी तरुणी साकारली होती. दोघंही व्यवसाय आणि प्रेम वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतात, मात्र पुढे त्यांच्यात प्रेम फुलतं आणि त्यातून अनेक मजेशीर वळणं कथा घेते.
‘धुरंधर’च्या यशाचा आनंद
दरम्यान, रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात रणवीरने साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. कथेमधील थरार, अनपेक्षित वळणं, प्रभावी पार्श्वसंगीत आणि दमदार दृश्यरचना यामुळे ‘धुरंधर’ला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.























