मुंबई : हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर मालवी मल्होत्रावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहे. काल रात्री मालवी मल्होत्रावर तिच्याच एका मित्राने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


अभिनेत्रीच्या मालवी मल्होत्राच्या शरीरावर तीन वार करण्यात आले आहेत. मालवी मल्होत्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.


मालवी मल्होत्रा ही मुळची हिमाचल प्रदेश येथे राहणारी आहे. मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. पण तिने त्या त्याला नकार दिला होता. मालवीने दिलेल्या नकाराच्या रागातूनच योगेशने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे.


मालवीने दिलेल्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. काही दिवसांपूर्वी मालवी शुटिंगसाठी दुबईला गेली होती. दोनच दिवसांपूर्वी मालवी दुबईहून मुंबईला परतली होती. काल रात्री अंधेरीतील वर्सोवा भागात आरोपी योगेश आला आणि मालवीवर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी आरोपीने वार केल्याची माहिती मिळत आहे.


जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या मालवीवर अंधेरीतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती सुदैवाने धोक्याबाहेर आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, मालवी मल्होत्राने तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचसोबत तिने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. कलर्स टिव्हीवरील उडान मालिकेतूनही मालवी झळकली होती.


महत्त्वाच्या बातम्या :