नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संकट कायम असलं तरी त्यात एक आशेचा किरण दिसू लागला आहे. कारण देशभरात मागील 24 तासात 36 हजार 469 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यानंतर देशात पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 18 जुलै रोजी देशात 34 हजार 884 कोरोबाधित आढळले होते. यासोबतच देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरातही सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आता हा मृत्यूदर 1.5 टक्के आहे. आरोग्य मंत्रालायाच्या माहितीनुसार आता 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यदर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.


देशभरात आतापर्यंत 1 लाख 19 हजार 502 जणांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 79 लाख 46 हजार 430 आहे. त्यापैकी एक लाख 19 हजार 502 जणाचा मृत्यू झाला आहे. तर 72 लाख एक हजार 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 6 लाख 25 हजार 857 जणांवर उपचार सुरु आहे. काल (26 ऑक्टोबर) 63 हजार 842 जण बरे होऊन घरी परतले आहेत.


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) आज (27 ऑक्टोबर) सांगितलं की, देशात 26 ऑक्टोबरपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 20 हजार 894 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी काल 9 लाख 58 हजार 116 जणांची चाचणी केली.


देशातील सर्वाधित कोरोनाबाधित महाराष्ट्रात
हाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात काल 3 हजार 645 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात काल 9 हजार 905 रुग्ण बरे झाले असून 84 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 लाख 48 हजार 665 झाली आहे. त्यापैकी 14 लाख 70 हजार 660 कोरोनामुक्त झाले असून 43 हजार 344 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1 लाख 34 हजार 137अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात सर्वाधित कोरोनाबाधित महाराष्ट्रातच आहेत.


कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर पुण्यात देशात सर्वाधिक
पुण्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर देशात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. रविवापर्यंत (25 ऑक्टोबर) पुणे शहरातील तब्बल 1 लाख 48 हजार 870 रुग्ण करोनातून संपूर्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णा बरे होण्याच्या बाबतीत पुण्याने मुंबई, बंगळुरु, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांना मागे टाकलं आहे. रविवारी पुणे शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93.21 टक्के एवढा नोंदवण्यात आला. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 90.76 टक्के आहे. बंगळुरुत 81.17 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोलकाता शहरात रुग्ण बरे होण्याचा दर 87.22 टक्के तर अहमदाबाद शहरात 86.99 टक्के एवढा आहे.