नवी दिल्ली: एकीकडे लडाखच्या सीमेवर चीनसोबत तणाव असताना भारताने आज अमेरिकेसोबत टू प्लस टू चर्चेअतंर्गत बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट (BECA) करार केला आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या लष्करी आणि सामरिक संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. चीनबरोबरच्या भारताच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत झालेला हा करार महत्वपूर्ण मानला जातोय.
आज होत असलेल्या टू प्लस टू चर्चेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाम्पियो व संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी भाग घेतला. या चर्चेत BECA करारांतर्गत सूचनांचे आदान प्रदानच्या विस्तारावर भर देण्यात आला. तसेच संरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांत सहकार्य वाढवण्याचे ठरले आहे.
भारतासोबत टू प्लस टू चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाम्पियो आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर हे सोमवारपासून दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दोन देशांदरम्यान पहिली टू प्लस टू चर्चा 2018 साली दिल्ली येथे पार पडली होती.
या करारामुळे आता भारताला अमेरिकेसोबत संवेदनशील माहितीचे आदान प्रदान करता येऊ शकेल. त्याचा वापर भारताच्या लष्करी वापरासाठी होऊ शकतो. या करारांतर्गत अनेक क्लासिफाईड्स डॉक्युमेंटचेही आदान प्रदान करता येणार आहे. त्यामुळे हा करार भारतासाठी महत्वपूर्ण आहे.
भारतासारख्या समान विचारधारा असलेल्या देशांशी सहकार्य आवश्यक
भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा चीनचा प्रयत्न या पार्श्वभूमीवर हा करार होत आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने सांगितले आहे की, "हिमालय ते दक्षिण चीन समुद्राच्या प्रदेशात चीनच्या आक्रमक भूमिकेला पायबंद घालण्यासाठी भारतासारख्या समान विचारधारेच्या मित्रांचे सहकार्य आवश्यक आहे."
भारताच्या दौऱ्यावर आलेल्या माईक पाम्पियो हे पंतप्रधान नरेद्र मोदी आणि अजीत डोवाल यांचीही भेट घेणार आहेत.
अमेरिकेने भारताला 2016 साली प्रमुख संरक्षण भागीदार (Major Defence Partner) असा दर्जा दिला होता. त्यावेळीपासून भारत आणि अमेरिकेत संरक्षणासंबंधी व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढीस लागले.