मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक केली आहे. प्रीतिका चौहानला ड्रग पेडलर फैझल याच्याकडून ड्रग्ज घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी (25 ऑक्टोबर) ही माहिती दिली. या दोघांनाही 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रीतिकाने जामीनासाठी अर्ज केला असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. तसंच एनसीबीला दिलेला जबाब तिने फिरवला आहे.


अंमली पदार्थांच्या सौद्याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनसीबी-मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री वर्सोव्यातून दोघांना पकडलं. त्यांच्याकडून 99 ग्राम 'मारिजुआना' जप्त करण्यात आलं. या दोघांनी कथितरित्या वर्सोव्यात राहणाऱ्या दीपक राठोडकडून हे ड्रग घेतल्याची कबुली दिली. एनसीबीने अटक केलेल्या दोघांना कोर्टात हजर असता त्यांना 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान एनसीबीचे अधिकारी साध्या कपड्यांमध्ये मुंबईच्या वर्सोवामधील दोन ठिकाणी देले होते. एनसीबीच्या पथकाने पाच जणांना अटक केली असून ऑपरेशन अजून सुरु आहे


मूळची हिमाचल प्रदेशची असलेली 30 वर्षीय प्रीतिका चौहान ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. मागील पाच वर्षात तिने सीआयडी, सावधान इंडिया, संकटमोचन महाबली हनुमान आणि देवों के देव महादेव यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.





दुसऱ्या एका कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांनी शनिवार रात्री उशिरा मशिद बंदर स्टेशनजवळून टांझानियाच्या नागरिकाला4 ग्राम कोकेनसह अटक केली. आरोपी ब्रूनो जॉन नगवालेच्या चौकशीनंतर वर्सोवातील एका परिसरात छापा टाकण्यात आला. यामध्ये 4.40 ग्रॅम 'एक्सटसी' आणि 1.88 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आलं.


वर्सोवातून रोहित हिरे नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. एका वाहनातून 325 ग्रॅम 'गांजा', 32 ग्रॅम 'चरस' आणि 5 ग्राम मेथम्फेटामाईनसह 12 हजार 990 रुपये जप्त करण्यात आले.


अनेक अभिनेत्रींचीही एनसीबीकडून चौकशी
दरम्यान ड्रग्ज अँगलमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती महिनाभर जेलमध्ये होती. ती सध्या जामीनावर बाहेर आहे. याशिवाय अनेक जण अजूनही तुरुंगात आहेत. याशिवाय दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींनी एनसीबीने या प्रकरणात चौकशी केली आहे.