Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत होणार ‘मल्हार’ची एण्ट्री! अभिजीत खांडकेकर दिसणार नव्या भूमिकेत
Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरांत पोहोचल्यानंतर आता अभिनेता अभिजीत खांडकेकर एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत होणार ‘मल्हार’ची एण्ट्री! अभिजीत खांडकेकर दिसणार नव्या भूमिकेत Abhijit Khandkekar will be seen in upcoming Marathi serial Tujhech Mi Geet Gaat Aahe on Star Pravah Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत होणार ‘मल्हार’ची एण्ट्री! अभिजीत खांडकेकर दिसणार नव्या भूमिकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/22/1314cf57812c89537d32abbe64b3ed30_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरांत पोहोचल्यानंतर आता अभिनेता अभिजीत खांडकेकर एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा, ज्या गायकाच्या प्रेमात आहे, त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर साकारणार आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, ‘आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मी गायक नाही, मात्र उत्तम कानसेन आहे. याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे. त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही, मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे.’
पुढे तो म्हणाला की, ‘कुठलंही नवं काम नेहमीच नवी स्फुर्ती घेऊन येत असतं. त्यामुळे सध्या उत्सुकता आणि हुरहुर अश्या दोन्ही भावना आहेत. जुन्या भूमिकेची नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप असते. त्यामुळे नवी भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवणं, हे आव्हानात्मक असतं. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका प्रेक्षक प्रेमाने पहात आहेत आणि टीआरपीच्या रुपात भरभरुन प्रेम देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत जोडला जाण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीय. याआधी मी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या नव्या कलाकृतीला देखील तेवढंच प्रेम मिळेल ही आशा आहे.’ येत्या 2 मेपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)