Kalim Qureshi : इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करणारा कलीम कुरेशी कोण? एकाच वेळी दोन पक्षातून दोन प्रभागातून उमेदवारी
Imtiaz Jaleel Car Attack : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याचा आरोप असलेला कलीम कुरेशी चर्चेत आला असून तो माजी नगरसेवक आहे.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला असून माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. जलील यांच्या कारवर हल्ला करण्यामागे कलीम कुरेशी (Kalim Qureshi) असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कलीम कुरेशी हा एकाच वेळी, प्रभाग 9 मधून वंचित पक्षाकडून तर प्रभाग 14 मधून काँग्रेसमधून निवडणुकीसाठी उभा आहे.
कलीम कुरेशी आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये जुना वाद असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळेच कलीम कुरेशीने एमआयएमची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे.
संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आले असता त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. ते त्यांच्या थार कारमध्ये बसले असता कारचा पाठलाग करून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Who Is Kalim Qureshi Seth : कोण आहे कलीम कुरेशी?
कलीम कुरेशी हा छत्रपती संभाजीनगरमधील माजी नगरसेवक असून मोठ्या प्रमाणात असलेल्या खाटीक समाजाचे तो नेतृत्व करतोय अशी माहिती आहे. या आधी तो एमआयएममध्ये होता. पण इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद झाल्यानंतर कलीम कुरेशीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कलीम कुरेशी सध्या एकाच वेळी दोन पक्षातून दोन ठिकाणी निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे. तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये तो काँग्रेसचा उमेदवार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अवैध दारूच्या व्यवसायामध्ये त्याचा हात असल्याचा आरोप केला जातो.
कलीम कुरेशी हा भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा माणूस असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. या दोघांच्या आदेशाप्रमाणे कलीम कुरेशी काम करतो आणि त्या बदल्यात त्याच्या अवैध व्यवसायांना सत्ताधाऱ्यांचे संरक्षण मिळतं असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.
तर, इम्तियाज जलील यांचे लोकमत घसरत चाललं असून त्यांनीच स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप कलीम कुरेशी यांने केला. संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यानंतर महापालिका निवडणुकीचं राजकारण मात्र चांगलंच तापल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा:




















