(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinod Tawde: महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची चर्चा अन् भाजपचा मोठा निर्णय; विनोद तावडेंचं 'राजकीय वजन' आणखी वाढणार!
Vinod Tawde: विनोद तावडे हे केवळ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नसून पक्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत.
Vinod Tawde: राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी बुधवारी पक्षाकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार?, याची चर्चा रंगली असताना विनोद तावडेंना ही जबाबदारी दिल्याने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
विनोद तावडे यांच्या मदतीसाठी संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लाल सिंग आर्य यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोव्याचे निरीक्षक म्हणून सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील भाजप संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या. आता भाजप मंडल अध्यक्षांची निवडणूक 15 डिसेंबरपर्यंत, तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
अमित शाह अन् विनोद तावडे यांच्यात चर्चा-
विनोद तावडेंना अमित शाह यांनी भेटीसाठी बोलवलं होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात तावडे आणि अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, याचा अमित शाह यांनी अंदाज घेतला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची भारतीय जनता पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.
कोण आहेत विनोद तावडे?
विनोद तावडे हे केवळ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नसून पक्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. पक्षातील सर्वोच्च नेतृत्वाच्या भूमिकेसाठी त्यांच्या नावाचा सक्रियपणे विचार केला जातो. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, मराठी भाषा आदी महत्त्वाची खाती होती. जवळपास तीन वर्षे भाजप विरोधी पक्षात असतानाही त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत पक्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.
एकनाथ शिंदेंनी अनुत्तरीत प्रश्नांना दिला पूर्णविराम-
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वांच्याच मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळताना दिसतंय. कारण महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय. मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी आणि शाह जो काही निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल, असं एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत अनेक अनुत्तरीत प्रश्नांना पूर्णविराम दिलाय.