वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण 48 जागांवर लढणार, प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार
Prakash Ambedkar: आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच्यासर्व 48 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
Prakash Ambedkar on Lok Sabha Elections: वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) संपूर्ण 48 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या या उमेदवारीला येणाऱ्या खर्चास हातभार लागावा, म्हणून धुळ्यातील (Dhule) शंकर खरात या कार्यकर्त्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तब्बल पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असून ते विविध ठिकाणी आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आदिवासींचे हक्क आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात जनजागृती करीत आहेत. प्रकाश आंबेडकर हे काल धुळे शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत आदिवासी परिषद पार पडली. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण 48 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले असून आपण स्वतः अकोला मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.
विशेष म्हणजे याच मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे एकदा विजय देखील झाले असून त्यांच्या या लोकसभेच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीसाठी येणाऱ्या खर्चात हातभार लागावा. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी पन्नास हजार रुपयांचा धनादेश काल प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. शंकर खरात यांचा चिरंजीव जय खरात यांच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून त्यांनी हा पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रकाश आंबेडकर यांना दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून स्वागत केले जात आहे. शंकर खरात यांच्या या निर्णयाचे संपूर्ण धुळे जिल्ह्यात आणि राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागत केले जात आहे.
आज सटाण्यात आदिवासी हक्क परिषद
धुळ्यानंतर आज नाशिकच्या सटाणा शहरात आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर आज या सभेच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी हक्क परिषद महत्त्वाची मानले जात आहे. आदिवासींवर होणारा अत्याचार आणि आदिवासींचे हक्क यावर विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे.