Uttam Jankar : चंपारणमधून स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली तशीच लढाई मारकडवाडीमधून सुरू होईल, उत्तम जानकरांचा एल्गार
Uttam Jankar, सोलापूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा ईव्हिएमबाबत भाष्य केलंय.
Uttam Jankar, सोलापूर : "ज्या पद्धतीने चंपारणमधून स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली तशीच लढाई मारकडवाडी मधून सुरू होईल. अतुल लोंढे आणि यशपाल भिंगे यांनी मारकडवाडीची उर्जावण माती नेली आहे. ही माती ते राहुल गांधींच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी अर्पण करणार आहेत", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हिएम विरोधातील लढाईचा एल्गार केलाय. ते सोलापुरात एबीपी माझाशी बोलत होते.
उत्तम जानकर म्हणाले, परमेश्वरला स्मरून एक प्रश्न यांनी स्वतःला विचारला पाहिजे केवळ २२-२३ टक्के मत मिळवून आपण या खुर्चीवर बसतोय. या राज्यात अनेक लोकांनी evm ला विरोध केला, केवळ तांत्रिक बाब असल्याने लोकांना मांडणी करता येत नव्हती, त्यामुळे ते टिकलं नाही. पण आता याचा पडदाफाश होणार आहे, पण सोलापुरातून सुरु झालेलं हे आंदोलन राज्याला दिशा देणार आहे. मारकडवाडी मध्ये देखील केवळ सँपल करण्याचा प्रयत्न केला, त्याला कुठलीही अधिकृत भाव देणार नव्हती तरी त्याला 18 कोटी लोकांनी दाद दिली. भारतात निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे स्टेटस मरकडवाडी बद्दल होते याचा अर्थ लोकांमध्ये किती रोष आहे हे स्पष्ट होतं.
ईव्हीएम वर छापली जाणारी चिट्टी एका बाजूला भाजपचे चिन्ह तर दुसऱ्या बाजूला तुतारीचे चिन्ह छापले जाते. दहा तासानंतर तुतारीचे चिन्ह गायब होते आणि केवळ भाजपचे चिन्ह राहतं. आम्हाला तांत्रिक बाबींमध्ये जायचं नाही, आमची मागणी आहे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. मारकडवाडीमध्ये मतदान थांबवण्यासाठी सीआरपीएफच्या तीन तुकड्या पाठवल्या होत्या असं काय आम्ही राष्ट्रद्रोह केला होत? असा सवालही जानकर यांनी केला.
पुढे बोलताना उत्तम जानकर म्हणाले, माझ्यावर देखील तिथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्ही काय गुन्हा केला होता? आम्ही दिलेले मत गेले कुठे हे तपासायचे लोकांना अधिकार नाही का? असे वातावरण देशभर निर्माण झाले आहे. हे आंदोलन म्हणजे त्याचीच चिंगारी आहे, त्याचाच हा आक्रोश आहे. ही ठिणगी देशभर पेटणे आधी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे. राज्यात पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची आदेश काढले पाहिजे ते जर करणार नसतील तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यात याचिका दाखल करणार आहोत. जर होणार नसेल तर आमच्या महाविकास आघाडीचे लोक राहुल गांधी देखील मारकडवाडीमधून लाँग मार्च काढतील. ही आग राज्य, देशभर भडकत जाईल तेव्हा राज्यकर्त्यांना थांबता येणार नाही.