Lok Sabha Result 2024: भाजपला सर्वात मोठा धक्का; पहिल्या कलांमध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी 30 जागांवर आघाडीवर
Lok Sabha Result 2024: भाजपला सर्वात मोठा धक्का; उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी 30 जागांवर आघाडीवर, INDIA आघाडी 39 जागांवर आघाडीवर
लखनऊ: देशाच्या सत्तेचा राजमार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो त्याठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. राम मंदिर आणि हिंदुत्त्वाचा अजेंडा आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपचाच डंका वाजेल, अशी अपेक्षा होती. एक्झिट पोल्समध्येही (Exit Poll) तशीच अपेक्षा वर्तवण्यात आली होती. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर उत्तर प्रदेशात वेगळेच चित्र दिसत आहे. (Lok Sabha Election Result 2024)
देशातील मतमोजणीचे कल सातत्याने बदलत आहेत. आताच्या कलानुसार, उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी 37 जागांवर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने आघाडी घेतली आहे. तर 27 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाने घेतलेली ही आघाडी भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 2019 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला 63 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यंदा हा आकडा मोठ्याप्रमाणावर घसरल्यास भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश हे राज्य भारतीय राजकारणात सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. उत्तर प्रदेशातून देशाचा पंतप्रधान ठरतो, असे म्हटले जाते. त्यामुळे भाजपच्यादृष्टीने उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य आहे.
मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात एकत्रपणे निवडणूक लढवली होती. याचा फायदा इंडिया आघाडीला होताना दिसत आहे.
वाराणसीतून पंतप्रधान मोदी 6000 मतांनी पिछाडीवर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6000 मतांनी पिछाडीवर पडले होते. ही पिछाडी आता भरुन निघाली आहे. तरीही नरेंद्र मोदी 1600 मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे पक्षाचे अजय राय त्यांना कडवी टक्कर देत आहेत.
देशातील चित्र काय?
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन दोन तास उलटले आहेत. या काळात एकूण 543 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. यामध्ये एनडीए आघाडी 300 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 221 जागांवर आघाडीवर आहे. तर 21 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. केरळमध्येही काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. केरळमधील एकूण 20 पैकी 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर देशात एकूण 152 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आणखी वाचा