UP Election 2022 : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतलं सर्वात मोठं कोडं- मायावती इतक्या शांत का?
उत्तर प्रदेशामध्ये बसपाच्या हत्तीची संथ चाल यावेळी चांगलीच चर्चेत आहे. हा हत्ती कुठल्या भीतीने संथ चालतो आहे की कुणाला मदत करण्यासाठी त्यानं ही चाल निवडली आहे याची चर्चा यूपीच्या राजकारणात रंगली आहे
लखनौ : मायावती इतक्या शांत का? यूपीत सगळ्यांना पडलेलं महत्त्वाचं कोडं कुठलं असेल तर ते हे. निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी फारसा सहभाग घेतलेला नाही. अशा पद्धतीने मायावती नेमका कोणाचा फायदा करु पाहत आहेत की चौकशीला घाबरुन शांतता निवडली आहे याची खूप चर्चा सुरु आहे.
चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री. 2007 मध्ये तर अगदी पूर्ण बहुमताचं सरकार ज्यांनी बनवलं त्या मायावती यावेळच्या निवडणुकीत इतक्या शांत का आहेत? उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सर्वाधिक सस्पेन्स याच मुद्द्यावर आहे. उत्तर प्रदेशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला बसपाचा हत्ती या वेळी इतक्या संथगतीने का चाल करतो आहे, यावर बरीच चर्चा सुरु आहे.
2007 नंतर मायावतींचा घसरता आलेख
- 2007 मध्ये 403 पैकी 206 जागा जिंकत मायावती सत्तेत आल्या
- 2012 च्या निवडणुकीत बसपाला अवघ्या 80 जागा जिंकता आल्या, तब्बल 126 जागा कमी झाल्या
- 2017 ला भाजपच्या लाटेत मायावतींची ही घसरण आणखी वाढली, 403 पैकी अवघ्या 19 जागा बसपाला मिळाल्या
- त्यातही जिंकलेले बसपाचे 19 आमदार दुसऱ्या पक्षांमध्ये गेल्यामुळे ही संख्या निवडणूक संपेपर्यंत 3 वर आली
- अर्थात 2017 मध्ये सपाला त्यांच्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्या तरी मतदानाच्या टक्केवारीनुसार बसपा दुसऱ्या क्रमांकावर होती
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला खातंही उघडता आलं नव्हतं
- पण 2019 ला अखिलेश मायावती एकत्रित लढले ज्यात मायावतींचे दहा तर सपाचे पाच खासदार निवडून आले
मायावतींचं शांत असणे हे केवळ निवडणुकीपुरतं नाही. हाथरस, उन्नाव, सोनभद्र सारखी अनेक दलित अत्याचाराची प्रकरणं ज्यात काँग्रेस आक्रमक होताना दिसत होती. मात्र सीएए आणि इतर मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी केंद्रावर टीका केली नव्हती.
मायावतींच्या प्रचाराची स्टाईल वेगळी आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मायावतींची पहिली रॅली झाली 4 फेब्रुवारीला. जोपर्यंत इतर पक्षांचा प्रचार अभियानाचा धडाका जोरात सुरु होता. त्यांनी प्रचाराची सुरुवात यावेळी मुस्लीमबहुल आग्र्यातून केली हे देखील विशेष. सभांमध्ये त्यांचा रोख सत्ताधारी भाजपपेक्षा सपा आणि काँग्रेसवरही होता.
देशात चौकशी यंत्रणांचा ससेमिरा अनेक राजकारण्यांच्या पाठीमागे सुरु आहे मायावती देखील त्यापैकी एक. अर्थात एकगठ्ठा मतदार बाजूला असल्याने मायावती शांत राहूनही बरेच फायदे पदरात पडू शकतात. पण त्यांच्या शांत राहण्यामुळे त्यांचा मतदार गोंधळून दुसऱ्या बाजूला तर जाणार नाही ना एवढाच सवाल असेल.
मायावती इतक्या शांत असल्यामुळे उत्तर प्रदेशातला दलित मतदार गोंधळात असल्याचे चित्र आहे. समाजवादी पक्षाने जाटव उमेदवार काही ठिकाणी दिले आहेत. इतर पक्ष या मतदारांना खेचण्याचा प्रयत्न करतात तो यशस्वी होतो का हे पाहावे लागेल.