काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी एकही जागा जिंकणार नाही, उद्धव ठाकरेंचा दावा
विरोधकांनी जवानांच्या शौर्याचं खच्चीकरण करु नये. शौर्याचं राजकारण करण्याचा हक्क कुणालाही नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

बुलडाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधींनी गरीबी हटावची घोषणा केली होती, मात्र गांधींची गरीबी हटली आमचा गरीब तसाच राहिला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
सभेतील गर्दीला उद्देशून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे भगवं वादळ आहे. 56 पक्ष एकत्र आले तरी आपल्याला कुणी रोखू शकत नाही. देशद्रोहाचं कलम हटवण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावरुनही उद्धव ठाकरेनी टीका केली. देशद्रोहाचे कलम काढून टाकणार असे ते बोलतात, मात्र देशद्रोह्यांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. कन्हैया, दाऊद सारख्यांना वाचविण्यासाठी राहुल गांधीना देशद्रोह्याचा कायदा काढून टाकायचं आहे. ही इटली नाही हा भारत आहे, इथे देशद्रोह्याला जागा नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आजवर देशावर जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं गेलं नाही. पण आता दोन वेळा पाकिस्तानवर हल्ले झालेत. मोदीजी आता पाकड्यांचे कंबरडे मोडा, उद्या आपल्यावर हल्ले करायला शिल्लक राहता कामा नयेत. विरोधकांनी जवानांच्या शौर्याचं खच्चीकरण करु नये. शौर्याचं राजकारण करण्याचा हक्क कुणालाही नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी एकही जागा जिंकणार नाही, सर्व जागा महायुती जिंकणार. सरकारवर टीका करत मग सत्तेतून बाहेर का नाही पडत हे सतत शरद पवार विचारायचे कारण आम्ही बाहेर पडल्यावर यांना युती करायची होती.




















