Maharashtra Vidhan Sabha Election 2024: रोहित पाटलांना मतदारसंघात काम कसं करायचं माहिती नाही, मला त्यांचं आव्हानच वाटत नाही; संजयकाका पाटलांची घणाघाती टीका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवार गटात दोन माजी खासदार आणि एका आमदाराचा पक्षप्रवेश. झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेल्या संजयकाका पाटील यांनी शु्क्रवारी मुंबईत अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) आता तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून शरद पवार गटाच्या रोहित पाटील (Rohit Patil) यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यांना आजच अजितदादा गटाकडून एबी फॉर्म दिला जाईल. दरम्यान, अजितदादा गटातील पक्षप्रवेशानंतर संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. रोहित पाटील हे कॅमेराजीवी नेते असल्याचे त्यांनी म्हटले.
मी आता रोहित पाटील यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही. मात्र, ते ते कॅमेराजीवी, टीआरपी मिळवण्याची धडपड करणारे नेते आहेत. मतदारसंघात काम कसं करायचं त्यांना माहिती नाही. त्यामुळे रोहित पाटील यांना मी आव्हान मानत नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी अजितदादा गटात प्रवेश केल्यामुळे भाजप आणि आमच्यात कोणतीही धुसफुस नसेल. सर्वच कार्यकर्ते एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले. संजयकाकांच्या या टीकेला आता रोहित पाटील कशाप्रकारे उत्तर देतात, हे पाहावे लागेल.
दरम्यान, मुंबईतील आजच्या सोहळ्यात झिशान सिद्दीकी, इस्लामपूरचे निशिकांत पाटील, देवेंद्र भुयार आणि प्रतापराव चिखलीकर यांनीही अजितदादा गटात प्रवेश केला. तर यावेळी नवाब मलिक यांची कन्या सना मलिक आणि माऊली कटके यांना एबी फॉर्म देण्यात आला. सना मलिक या मुंबई उपनगरातील अणुशक्ती नगर, तर माऊली कटके हे शिरुर हवेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय, झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
सांगली विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा कायम
सांगली विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्र, काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळेल यावर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील गट ठाम आहे. काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील गटाने 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे घोषित केले आहे. पृथ्वीराज पाटील गटाकडून २९ ला शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सांगली विधानसभेच्या उमेदवारी बाबत काय निर्णय घेते आणि कुणाला उमेदवारी देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवारीवरून पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचाट