बिनविरोध निवडणुकीवरुन विरोधकांची टीका, तर श्रीकांत शिंदे म्हणाले 16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळणार
महानगरपालिकेच्या निव़डणुकीत काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याच मुद्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
Shrikant Shinde : महानगरपालिकेच्या निव़डणुकीत काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याच मुद्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिनविरोध निवडीने एक इतिहास घडला आहे, 16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळणार असल्याचा विश्वास श्रीकांत शिदेंनी व्यक्त केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दृष्टीने मतदारांची धावती भेट घेतली. यावेळी अनेक उमेदवारांच्या कार्यालयाचे त्यांनी उद्घाटन केले.
16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळेल
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज शहरात धावती भेट दिली. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली परिसरात अनेक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना “बिनविरोध निवडीने एक इतिहास घडला, तर 16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळेल, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की कल्याण पश्चिमने नेहमीच महायुतीला भक्कम साथ दिली असून, सत्ता स्थापनेत या भागाचा सर्वात मोठा वाटा राहिला आहे. यावेळी कल्याण पश्चिमेसह कल्याण पूर्वेतही महायुतीचा चांगला निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केडीएमसीमध्ये आधीच 20 नगरसेवक बिनविरोध निवडून येणं हा ऐतिहासिक टप्पा
भाजप-शिवसेना-आरपीआय व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करून पूर्ण पॅनल निवडून आणण्याचे आवाहन करत, केडीएमसीमध्ये आधीच 20 नगरसेवक बिनविरोध निवडून येणं हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे सुरू असून, त्याचाच प्रभाव कल्याण–डोंबिवलीत दिसत असल्याचं शिंदे म्हणाले. १६ तारखेला निकालानंतर महायुतीचीच सत्ता येईल आणि केडीएमसीत शंभर टक्के महायुतीचा महापौर बसेल, असा ठाम दावा त्यांनी केला.
मनपा निवडणुकीमध्ये चांदा ते बांदा भाजप, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. इतकेच नव्हे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा धमकी देणारा व्हिडिओ सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. यामध्ये ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना थेट सुरक्षा काढून टाकण्यासाठी धमकी देत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्रातील 69 पैकी 68 जागांवरती बिनविरोध निवडून आले आहेत.




















