Maharashtra Vidhansabha Election 2024: गुहागर मतदारसंघात नवा ट्विस्ट, श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याऐवजी अचानक 'या' कुणबी उमेदवाराचे नाव चर्चेत, नक्की काय होणार?
Maharashtra Vidhansabha Election 2024: शिवसेनेकडून गुहागरमध्ये कुणबी समाजाचा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Guhagar Vidhansabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत. त्यानंतर आज शिवसेना (शिंदे गट) पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र गुहागर विधानसभेच्या (Guhagar Vidhansabha Election 2024) जागेवरुन महायुतीचे काही ठरेना असेच दिसून येत आहे. गुहागरच्या जागेबाबत राज्य स्तरावर हालचालींना वेग आला असून भाजपकडून माजी आमदार डॉ. विनय नातू मतदार संघात सक्रिय असताना राजेश बेंडल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने गूढ वाढले आहे.
शिवसेनेकडून गुहागरमध्ये कुणबी समाजाचा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. माजी आमदार रामभाऊ बेंडल यांचा मुलगा राजेश बेंडल यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी सुरू आहे. राजेश बेंडल गुहागरनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. गुहागर विधासभा मतदार संघात 60% हून अधिक कुणबी समाजाचा प्रभाव असल्यामुळे राजेश बेंडल यांना विधानसभेसाठी तिकीट देण्याचा विचार सुरू आहे. राजेश बेंडल यांच्यासह कुणबी समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते.
भाजपकडून सोशल मीडियावर जोरदार कँपेनिंग-
'कहो दिल से नातू फिर से...' असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जोरदार कँपेनिंग सुरु केले आहेत. शिवसेनेकडून विपुल कदम यांच्या नावाच्या चर्चेनंतर भाजपकडून पहिल्यांदाच जाहीर पोस्ट करण्यात आली आहे. डॉ विनय नातू यांच्याच नावाची भाजपकडून जोरदार चर्चा सुरु आहे. पुढील दोन दिवसात गुहागरच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याची देखील चर्चा-
गुहाग विधानसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्या नावाची देखील चर्चा आहे. ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्कर जाधव यांच्याशी दोन हात करावे लागतील. विपुल कदम यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण ताकद उभी राहणार असली तरी भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सामना करताना विपुल कदम यांचा कस लागण्याची शक्यता आहे. तर भाजपने देखील गुहागरची जागा लढवण्यावर आग्रही असल्याने ही जागा नेमकी कोणच्या वाट्याला जाणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.