शिवसेना-भाजपची युतीची घोषणा, मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरु?
भाजपकडून 2014 च्या विधानसभेत 5000 हजारांहून कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येत आहे. अशा जवळपास 30 जागा भाजपने शोधायला सुरुवात केली आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणूक 2014 च्या विधानसभेच्या निकालांच्या धर्तीवर लढा, अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 220 मतदारसंघात आघाडी मिळाली. मात्र यापैकी अनेक विधानसभा मतदारसंघ असे आहेत, जे शिवसेनेच्या कोट्यातले असूनही त्याठिकाणी जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणात कौल दिला आहे. यामुळे पारंपरिक शिवसेनेच्या मतदारसंघातही भाजपची ताकद वाढताना दिसत आहे.
काय सुरु आहे भाजपच्या गोटात?
भाजपकडून 2014 च्या विधानसभेत 5000 हजारांहून कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येत आहे. अशा जवळपास 30 जागा भाजपने शोधायला सुरुवात केली आहे.
तसेच जवळपास 64 जागा अशा आहेत, ज्याठिकाणी भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर अगदी 500 ते 1000 मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. अशा उमेदवारांना उमेदवारी जवळपास निश्चित करण्याबाबत एकमत झालं आहे.
युतीचा 50-50 चा फॉर्म्युला अंतिम झाला तर भाजपच्या आताच्या 122 जागांमध्ये अधिकच्या फक्त 18 ते 20 जागांची भर पडेल. मात्र मागच्या निवडणुकीच्या निकालांचा आधार घेतला तर किमान 60 ते 70 जागांवर भाजपचं कमळ स्वबळावर फुलण्याची क्षमता आहे.
अशा परिस्थितीत भाजप स्वबळावर लढून स्वतःची ताकद वाढवून राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचं धाडस करणार की शिवसेनेसोबत राहून युती धर्माचं पालन करणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
शिवसेनेकडूनही स्वबळाची चाचपणी सुरु
मातोश्रीवर सध्या विधानसभा मतदारसंघ निहाय तालुकाप्रमुखांच्या बैठका सुरु आहेत, या बैठकांमध्ये युती झाली तर आणि नाही झाली तर काय करायचं? असा सवाल पक्षप्रमुखांनी विचारला आहे. शिवसेनेला 144 जागा भाजपकडून अपेक्षित आहेत. तसेच सत्तेतला समसमान वाटा, अडीच वर्ष मुख्यमंत्री पदही शिवसेनेला हवं आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्राकांत पाटील, सरोज पांडे यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेत नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून भाजपला झालेलं मतदान आणि भाजपच्या बालेकिल्ल्यातून शिवसेनेला झालेलं मतदान यांची आकडेवारी समोर ठेवून रणनिती शिवसेनेनं सुरु केली आहे.
काय सुरु आहे शिवसेनेच्या गोटात?
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवत महाराष्ट्रात शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. अजून काही वेगवेगळ्या नेत्यांच्या यात्रा निघतील. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगावातून याची सुरुवात करण्यात आली. या यात्रेत आदित्य ठाकरेंवरच फक्त भर देण्यात आला.
गेल्या 15 दिवसात राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार पाडुंरंग बरोरा आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना शिवसेनेनं पक्षात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नाईक, अवधूत तटकरे यांच्यासारखे बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत.
यासाठी 2014 च्या विधानसभेत 10 हजारांहून कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येत आहे. 2014 ला 26 जागांवर शिवसेना कमी फरकानं पराभूत झाली होती. अशा 26 मतदारसंघ आणि उमेदवारांची शिवसेनेकडून चाचपणी सुरु आहे.
युतीचा 50-50 चा फॉर्म्युला अंतिम झाला तर शिवसेनेच्या आताच्या 63 जागांमध्ये अधिकच्या फक्त 81 जागांची भर पडेल. 2014 मध्ये शिवसेना एकूण 26 जागांवर दोन नंबरवर होती आता त्या 26 पैकी काही जागांवर शिवसेनेचा डोळा आहे.
मात्र युतीत 81 जागा मिळत असल्यानं 26 जागांवर तसा वाद होणार नाही. युती झाल्यास सध्याचे 63 आमदार आणि 2014 ला नंबर दोनवर असलेले उमेदवार पकडले तर महाराष्ट्रात 90 जागांवर भगवा फडकू शकतो. स्वबळावर लढल्यास शिवसेनेतील अनेक आमदार फुटू शकतात. तसेच 63 पैकी कमी जागा जिंकून येण्याची शिवसेनेला भीती आहे. अशा परिस्थितीत शिवसेना स्वबळावर लढून स्वतःची ताकद वाढवून राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचं धाडस करणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.