Shahaji Bapu Patil: पहिल्या भेटीत जुळलं नसावं म्हणून पुन्हा जुळवण्यासाठी राज ठाकरेंची अदानींवर टीका; शहाजी बापूंची खोचक टीका, अजित दादांनाही डिवचलं
Shahaji Bapu Patil : राज ठाकरेंचे (Raj Thackeray) मोकळे इंजिन पळत असून त्यांच्या मागे कुठलाही डबा नाही. त्यामुळे जनता कधीच त्यांच्यासोबत नव्हती. असा टोला शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरेंना लगावलाय.

Shahaji Bapu Patil : राज ठाकरेंचे (Raj Thackeray) मोकळे इंजिन पळत असून त्यांच्या मागे कुठलाही डबा नाही. त्यामुळे जनता कधीच त्यांच्यासोबत नव्हती. त्यांनी भाषणात अदानी (Adani group) यांच्यावर टीका केली, याचं खरं कारण पहिल्यांदा भेटल्यावर जुळले नव्हते. आता पुन्हा जुळते आहे काय याचीही धडपड असल्याचा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावलाय.
Shahaji Bapu Patil on Raj- Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंची अस्तित्वाची वगैरे लढाई लढत नसून दोघांचे अस्तित्व आधीच संपलेलं
दरम्यान, दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र येऊन अस्तित्वाची वगैरे लढाई लढत नसून दोघांचे अस्तित्व आधीच संपले आहे, असे सांगताना राज ठाकरे यांनी पूर्वीच वेगळे व्हायला नको होते आणि आता वेगळे झाल्यावर पुन्हा एक येऊन त्यांनी चूक केली आहे, असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावलाय.
Shahaji Bapu Patil on Ajit Pawar Sinchan Scam: अजितदादांचे हात आधीच बरबटलेले
अजित पवार म्हणतात तसे कुठले इस्टिमेट वाढत नसते. युतीच्या काळात माझ्या पाचेगाव येथील साडेतीन कोटीच्या बोगद्याचे अजित दादाने साडेअठरा कोटी रुपये बिल काढले. अजित दादाचे हात आधीच बरबटलेले आहेत. अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली. अजित पवारांनी काल (13 जानेवारी) पत्रकार परिषदेत फडणवीस मुख्यमंत्री असताना एका प्रकल्पाचे इस्टिमेट 100 कोटींनी वाढवले आणि त्याचा वापर पक्षनिधी म्हणून केल्याचा सनसनाटी आरोप केला होता. याला उत्तर देताना शहाजी बापू पाटील यांनी आज अजितदादांनाच आरसा दाखवलाय.
अजित पवारांचा नेमका आरोप काय? (Ajit Pawar On Sinchan Scam)
अजित पवारांनी भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला आहे. 1999 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच त्या अधिकाऱ्याने कबुल केलं. पुढे त्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की, 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता, असा दावा अजित पवारांनी केला आहे.




















