एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, रामदास आठवलेंची अमित शाह यांच्याशी चर्चा, उद्धव ठाकरेंवरही बोलले
Ramdas Athawale : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला जावा, असं शाह यांना सांगितल्याचं ते म्हणाले.
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांवर भाष्य केलं. सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रामदास आठवले यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर देखील भाष्य केलं. रामदास आठवलेंनी यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये आरपीआयला नेमकं काय मिळावं याबाबत देखील भूमिका सांगितली. याशिवाय एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला जावा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितल्याची माहिती देखील रामदास आठवलेंनी दिली.
रामदास आठवले यांचा संजय राऊत यांना टोला
रामदास आठवले यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिलं. आमचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत त्यामुळे आम्ही परदेशातील लोकांना सुद्धा उद्या बोलवू, असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सुद्धा उद्यासाठी बोलावलं आहे हे पाहावं असं आठवले यांनी म्हटलं.
रामदास आठवले यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर देखील भाष्य केलं. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांचा मान सन्मान आणखी वाढला असता. काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी मोठी चूक केली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचा सन्मान झाला पाहिजे, रामदास आठवलेंची अमित शाहांसोबत चर्चा
रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात देखील वक्तव्य केलं आहे. आज अमित शहा यांच्याशी मी बोललो आहे. एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे,असं रामदास आठवले म्हणाले. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील आज शाह यांच्याशी बोलणं झालंय, असं त्यांनी सांगितलं.
महायुतीत आरपीआयला काय मिळणार?
रामदास आठवले यांनी महायुतीत आम्हाला एक आमदार आणि एक मंत्रिपद हवं आहे, असं सांगितलं. ही मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याचं देखील ते म्हणाले. इव्हीएमवरुन होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना रामदास आठवले यांनी ते काँग्रेसनं आणल्याचं म्हटलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे विविध नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. तर, एकनाथ शिंदे महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबाबत अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाल्याची माहिती आहे.
इतर बातम्या :