Raj Thackeray & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंची शांतीत क्रांती, कल्याण-डोंबिवली, ठाण्यात महायुतीपूर्वीच 90 टक्के जागावाटप उरकलं, शिवसेना-भाजपचं घोडं पुढेच सरकेना
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या महापालिकांतील जागावाटप जवळपास पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: एकीकडे सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) जागावाटपावरून तीव्र मतभेद, अंतर्गत धुसफूस आणि नाराजी सुरू असताना, दुसरीकडे विरोधी गटातील राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मात्र कोणताही गाजावाजा न करता ‘शांतीत क्रांती’ घडवत महत्त्वाच्या महापालिकांतील जागावाटप जवळपास पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील शिवसेना–भाजपची गाडी जिथे पुढे सरकताना अडखळते आहे, तिथे ठाकरे बंधूंची युती निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: महत्त्वाच्या महापालिकांत जागावाटप जवळपास पूर्ण
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे महापालिका, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. सध्या केवळ एक अंकी जागांवर चर्चा बाकी असून, त्या देखील येत्या एक-दोन दिवसांत निकाली निघण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, ठाणे महापालिकेत 90 टक्के जागावाटप निश्चित, मीरा-भाईंदरमध्ये 95 टक्के, वसई-विरारमध्ये 90 टक्के, कल्याण-डोंबिवलीमध्ये 85 टक्के जागावाटप निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे महायुतीच्या आधीच ठाकरे बंधूंचे जागावाटप पूर्ण होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: महायुतीत धुसफूस सुरू असतानाच ठाकरे बंधूंच्या हालचालींना वेग
महायुतीमध्ये पक्षप्रवेश, उमेदवारी आणि जागावाटपावरून जेव्हा नाराजी थेट दिल्लीपर्यंत पोहोचली होती, त्याच काळात मनसे आणि ठाकरे गटामध्ये पडद्यामागे समन्वयाची प्रक्रिया सुरू झाली होती. वरिष्ठ नेत्यांकडून युतीसाठी सकारात्मक संकेत मिळताच, ठाणे विभागातील स्थानिक नेत्यांनी संभाव्य जागावाटपाचे प्रस्ताव तयार केले आणि त्यावर सलग बैठका घेण्यात आल्या.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: समोरासमोर बैठका
मागील आठवड्यात राजन विचारे, विनायक राऊत, यांच्यासह अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांनी प्रत्येक महापालिकेत पदाधिकाऱ्यांची समोरासमोर बैठक घेतली. या बैठकीत जुने मतभेद बाजूला ठेवत अंतिम जागावाटपावर जवळपास एकमत झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Congress - NCP: काँग्रेस-राष्ट्रवादी अद्याप चर्चेत नाहीत
या युतीत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा समावेश झालेला नाही. मात्र, “जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुढाकार घेत चर्चेला बसण्याची तयारी दर्शवली, तर त्यांच्यासाठीही काही जागा सोडण्याचा विचार होऊ शकतो,” अशी माहिती मिळत आहे.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: युती जाहीर होताच संयुक्त सभांचा राज्यभर दौरा?
ठाकरे बंधूंची युती अधिकृत जाहीर झाल्यानंतर राज्यभरात 6 ते 7 संयुक्त सभा घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र व्यासपीठावर यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक, मीरा भाईंदर या ठिकाणी ठाकरे बंधू संयुक्त सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा




















