(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune By poll election : जिंकलंस पोरी! मतदानासाठी लंडनहून थेट गाठलं पुणे
पुण्यातील कसबा मतदार संघासाठी मतदान करण्यासाठी एक तरुणी थेट लंडनहून पुण्यात दाखल झाली. अमृता देवकर असं या तरुणीचं नाव आहे.
Pune Bypoll election : कोणत्याही निवडणुकीत एका एका मताला महत्व असतं. मात्र अनेक लोक मतदानाच हक्कच बजवत नाही. अनेकदा निवडणुका आल्या मतदान करा, सजग नागरिक बना, अशी जनजागृती केली जाते. मात्र खरे मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. पुण्यातील कसबा मतदार संघासाठी मतदान करण्यासाठी एक तरुणी थेट लंडनहून पुण्यात दाखल झाली. अमृता देवकर असं या तरुणीचं नाव आहे.
मतदान हा आपला अधिकार आणि तो हक्क आहे सगळ्यांनी तो बजावलाच पाहिजे, अशी भूमिका पुढे घेऊन जात अमृता देवकर ही तरुणी थेट लंडनहून आज पुण्यात पोहचली. तब्बल 12 तासाहून अधिक प्रवास करून आलेल्या अमृता यांनी पुण्यात येताच थेट मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला. भारतातच नाही कोणत्याही देशात रहा पण मतदान करायलाच पाहिजे असं ती म्हणते.
अमृताने लंडनहून येऊन थेट मतदान केंद्र गाठलं आणि मतदान केलं. ती रात्री दीडच्या सुमारास मुंबईत आली. त्यानंतर ती सकाळी आठ वाजता पुण्यात दाखल झाली. काही वेळाची विश्रांची घेतली आणि थेट पुण्याच्या नुमवी शाळेत मतदानासाठी दाखल झाली. तिची मतदानासाठी असलेली जागृकता अनेकांना नवा संदेश देऊन गेली.
पोटनिवडणुकीसाठी अनेकदा फारसं मतदान होत नाही. त्यासाठी सगळेत उमेदवार फक्त मतदान होण्यासाठी देखील प्रयत्न करत असतात. त्यावर अमृता म्हणते की विकासाची दिशा ही नागरिकांनीच ठरवायची असते. नागरिक कायम तक्रारीच करत असतात मात्र मोहिमेत सहभागी फार होत नाही. मात्र नागरिकांनी या पोटनिवडणुकीत सहभागी होणं गरजेचं आहे. जेणेकरुन सगळे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असं ती म्हणाली.
लंडनचे नागरिक नसले तरीही मतदान करता येतं...
भारत आणि लंडनच्या निवडणूक प्रक्रियेत फार फरक आहे. भारतात भारतीयांंचं नागरिकत्व असल्याशिवाय मतदान करता येत नाही मात्र लंडनमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मतदान करता येतं. त्या परिसराच्या विकासासाठी आपण प्रश्न विचारु शकतो. लंडनमध्ये पोस्टामार्फत मतदान करता येतं. त्यामुळे अनेक नागरिक मोठ्या संख्येनं मतदान करताना दिसतात. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की आपला हक्क आपल बजावला पाहिजे. तोच हक्क मी बजावला आणि काहीच दिवसात लंडनला परतदेखील जाणार असल्याचं सांगितलं. पुण्यात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आपलं नशीब आजमावत आहेत.