Parbhani ZP Election 2026: परभणीत अजब प्रकार, माजी मंत्र्यांच्या कुटुंबातील पाच जण जिल्हा परिषदेच्या मैदानात, मुलगा, सुन, पुतण्या भाजपकडून तर मुलगी ठाकरेंच्या शिवसेनेतून रिंगणात
Parbhani ZP Election 2026: परभणीतील भाजपचे माजी आमदार तथा जेष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील ५ जण विविध पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Parbhani ZP Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत (Parbhani ZP Election 2026) माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर (suresh varpudkar) यांच्या कुटुंबातील तब्बल पाच जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपकडून मुलगा, सून आणि पुतण्या, उबाठा शिवसेनेकडून मुलगी तर काँग्रेसकडून आणखी एक पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेत्यांच्या घरातील अनेक उमेदवार मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आता तेच चित्र जिल्हा परिषद निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून येत आहे. परभणीतील भाजपचे माजी आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे जिल्ह्यातील प्रभावी व ज्येष्ठ नेते मानले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असून, महापालिका निवडणुकीत त्यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
Parbhani ZP Election 2026: कुटुंबातील पाच जण विविध पक्षांकडून निवडणूक रिंगणात
याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबातील पाच जण विविध पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याने राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांची पत्नी प्रेरणा वरपुडकर या दैठणा गटातून भाजपच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. तसेच वरपुडकर यांचे पुतणे बोनी वरपुडकर हे लोहगाव गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
Parbhani ZP Election 2026: मुलगी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात
दुसरीकडे, सुरेश वरपुडकर यांच्या कन्या सोनल देशमुख या उबाठा शिवसेनेकडून झरी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उबाठा शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एका बाजूला भाजप, तर दुसऱ्या बाजूला उबाठा शिवसेना असा थेट सामना एकाच कुटुंबात पाहायला मिळत आहे.
Parbhani ZP Election 2026: पुतणे काँग्रेसकडून लढताय निवडणूक
याहूनही विशेष म्हणजे, लोहगाव गटातूनच सुरेश वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अजित वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांचे राजकीय मतभेद सर्वश्रुत असून, याआधीही दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा होती. तसेच बोनी वरपुडकर यांचे वडील विजय वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांच्यातही पूर्वी मतभेद होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेश वरपुडकर आणि विजय वरपुडकर यांच्यात अलीकडे काहीसे समेटाचे सूर दिसून येत असल्याची चर्चा आहे.
Parbhani ZP Election 2026: सोशल मिडीयावर चर्चांना उधाण
एकाच कुटुंबातील पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्याने सोशल मिडीयावर याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. घराणेशाही, पक्षनिष्ठा आणि स्थानिक राजकारण या सर्व मुद्द्यांवरून परभणी जिल्ह्यातील ही निवडणूक सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असून, मतदार काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा




















