Adhir Ranjan Chowdhury : सर्वोच्च नेतृत्वात फेरबदलाची गरज नाही, राहुल-प्रियंका मनापासून प्रयत्न करतायेत : अधीर रंजन चौधरी
पाच राज्यातील निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील सर्वोच्च नेतृत्त्वात बदल करण्याची चर्चा केली जातेय. यावर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Adhir Ranjan Chowdhury : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पाचही राज्यात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या पाचपैकी काँग्रेसची सत्ता असणारे पंजाब राज्यही काँग्रेसने आता गमावले आहे. तिथे आम आदमी पार्टीने करिष्मा केला आहे. तर बाकी, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली नाही. या निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील सर्वोच्च नेतृत्त्वात बदल करण्याची चर्चा केली जातेय. तशी काही जणांनी मागणी देखील केली आहे. दरम्यान, यावर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अधीर रंजन चौधरी
सर्वोच्च नेतृत्वात कोणत्याही फेरबदलाची गरज नाही. राहुल-प्रियंका मनापासून प्रयत्न करत आहेत, असे अधीर रंजन चौधरी म्हणालेत. काँग्रेसचे नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी भविष्यातील निवडणुकांमध्ये अपेक्षित निकालांसाठी "पुनर्रचना" करण्याचे आवाहन केले होते. तसेच या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांवर भर दिला. मात्र, त्यांनीही सर्वोच्च नेतृत्वात बदल करण्याचे नाकारले आहे.
आमच्या पक्षात संघटनात्मक कमकुवतपणा आहे आणि त्यामुळेच आमचा पराभव झाला आहे. पंजाबमधील आमचा पराभव हा आमच्याच चुकांचा परिणाम आहे. पंजाबमधील सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. गोव्यातील पक्षाच्या पराभवासाठी त्यांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले. आम्ही गोव्यात निवडणूक जिंकू शकलो असतो, पण तृणमूलच्या नुकसानीमुळेच आम्ही तिथे हरलो. तृणमूल काँग्रेस तिथे भाजपच्या एजंटसारखे वागत होती. भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी मतांचे विभाजन करण्याचे काम केले. त्यामुळेच गोव्यातही आमचा पराभव झाल्याचे अधीर रंजन म्हणाले.
पाच राज्यांतील पक्षाचा पराभव अत्यंत निराशाजनक असल्याचे सिंघवी म्हणाले. आम्ही पंजाबमधील पराभव स्वीकारला आहे. परंतू गोवा आणि उत्तराखंडमधील पराभव खरोखरच धक्कादायक आहे. आम्ही सर्वकाही स्वीकारण्यास तयार आहेत. आम्हाला पक्षाच्या खालच्या स्तरावरून पुनर्रचनेची गरज आहे.