मोठी बातमी! भाजपचे निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार? कोकण राखण्यासाठी महायुतीत खांदेपालट
Vidhan Sabha Election 2024: शिवसेना नेते उदय सामंत यांच्या सोबत भाजपचे तळ कोकणातील नेत्यांसह माजी खासदार निलेश राणे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना महायुतीच्या (Mahayuti) गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या सोबत भाजपचे तळ कोकणातील नेत्यांसह माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. निलेश राणे हे कुडाळ-मालवण (Kudal Malvan Assembly Constituency) विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे निलेश राणे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच हा पक्षप्रवेश पार पडल्यास त्यांची उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोकण राखण्यासाठी महायुतीत खांदेपालट होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोकण राखण्यासाठी महायुतीत खांदेपालट होण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नारायण राणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनं या चर्चाना उधाण आले हे. तर निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी (Uday Samant) या पूर्वीच दिली आहे. त्या पाठोपाठ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले केलं. निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र युतीमध्ये एकमेकाचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. आमची युती एवढी घट्ट आहे की यात एकमेकाचे उमेदवार बदलले जातील, अशी रोखठोक भूमिकाही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. दरम्यान आज निलेश राणेंसह तळ कोकणातील प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या चर्चेसाठी एकत्र आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे निलेश राणे लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिंदेंची शिवसेना जागा सोडणार?
निलेश राणे यांनी विधानसभा लढवण्याबाबत दुजोरा तर दिला. पण, मतदारसंघाचं नाव मात्र घेतलं नाही. पण, त्यानंतर देखील मिळत असलेल्या माहितीनुसार निलेश राणे कुडाळ - मालवणमधून लढणार असल्याचं बोललं जात आहे. पण, सध्या या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे जागावाटपाच्या प्राथमिक सुत्रानुसार ही जागा शिंदे गट भाजपला सोडणार का? हे देखील पाहावं लागेल. त्यानंतरच निलेश राणे यांचा पुढील मार्ग मोकळा होणार आहे.