(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Shiv Sena and NCP MLA disqualification case : गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त तारखांवर तारखा पडूनही सुनावणी होत नसलेल्या सत्तासंघर्षाशी निगडीत सुनावणीसाठी नव्या तारखा पुन्हा एकदा मिळाल्या आहेत.
Shiv Sena and NCP MLA disqualification case : महाराष्ट्रात निवडणूक लागली, तरी महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होऊ शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना काल कार्यालयीन निरोप दिल्यानंतर उद्या (10 नोव्हेंबर) ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त तारखांवर तारखा पडूनही सुनावणी होत नसलेल्या महाराष्ट्र सत्तासंघर्षाशी निगडीत सुनावणीसाठी नव्या तारखा पुन्हा एकदा मिळाल्या आहेत. अर्थात, सुनावणीच्या तारखा तात्पुरत्या असून बदलू शकतात. सुनावणीच्या तारखा तात्पुरत्या तारखांनुसार शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 10 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाचा वादावर 13 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव वादावर 18 नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
या वर्षभरात काय घडलं?
- 15 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
- 22 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी, शिंदे गटाच्या सर्व आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावण्यात आली.
- 7 मार्च 2024 : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला का? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आणि विधानसभा अध्यक्षांसमोरील मूळ सुनावणीची कागदपत्रे मागवली
- 23 जुलै 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी होती मात्र वेळेअभावी होऊ शकली नाही
- 29 जुलै 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली. याच दिवशी अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आणि यापुढे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी एकाच दिवशी मात्र स्वतंत्र होणार असे न्यायालयाने सांगितले
- दरम्यान आणि त्यानंतरही हे प्रकरण वेळापत्रकात येत गेले, मात्र सुनावणी होऊ शकली नाही.
नव्या सरन्यायाधीशांना अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी
दरम्यान, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. 64 वर्षीय न्यायमूर्ती खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खन्ना यांनी 65 निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे 275 खंडपीठांचा भाग राहिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते 14 वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती. त्यामुळे नव्या सरन्यायाधीशांसमोर तरी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील वासलात लागणार का? याबाबत साशंकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या