'मत दिलं की नाही हा केवळ अंदाज, अपक्षांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही' : एकनाथ खडसे
Eknath Khadse On Rajya Sabha Election : एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, मतदारावर विश्वास दाखवावा लागतो, मत दिलं की नाही दिलं हा अंदाज असू शकतो. मात्र निश्चित स्वरूपात सांगणे योग्य होत नाही.
Eknath Khadse On Rajya Sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एका जागेवर पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नाव घेत त्या आमदारांनी भाजपला मतदान केलं असल्याचा दावा केला. याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, मतदारावर विश्वास दाखवावा लागतो, मत दिलं की नाही दिलं हा अंदाज असू शकतो. मात्र निश्चित स्वरूपात सांगणे योग्य होत नाही. आमदारांवर जी जबाबदारी सोपवली आहेत ते निश्चितपणे पार पाडलेली दिसतेय. अपक्षांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केलं.
कुठल्याही प्रकारचा दगाफटका न होता ही निवडणूक जिंकायचीय
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत रणनीती काय असणार याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, पक्षाच्या वतीनं आमदारांच्या भेटीगाठीची सुरुवात माघारीनंतर सुरू होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत हा अनुभव लक्षात घेता पक्ष आणि आम्ही सर्व मिळून अधिक काळजीपूर्वक या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे पाहत आहोत. कुठल्याही प्रकारचा दगाफटका न होता ही निवडणूक जिंकायची आणि या दृष्टीने सर्व मिळून प्रयत्न करायचे अशी भूमिका पक्षाने घेतली आहे, हिच आमची भूमिका आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
भाजपने पंकजा मुंडे यांना डावललं याचं मला दुःख - एकनाथ खडसे
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली. यामध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं की, पंकजा मुंडे यांना डावलले याचं मला दुःख आहे. मुंडे-महाजन-खडसे या नावाने काही कालखंड भाजपाची ओळख होती. वर्षानुवर्ष अनेकांनी त्यात योगदान दिलं. अनेकांच्या मदतीने पक्षाचा विस्तार झाला. मुंडे साहेब आमचे नेते होते. त्यांनी यासाठी उभे आयुष्य खर्ची घातलं ,त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला प्रामुख्याने पंकजाताईंसारख्या ओबीसी नेतृत्वाला ज्यांचा परिचय सर्व महाराष्ट्राला आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. अशा स्थितीत त्यांना डावलण्याचं काय कारण आहे हे मी समजू शकलेलो नाही, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.