Nawab Malik : अखेर सस्पेन्स संपला... नवाब मलिकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म, अजित पवारांनी मित्रपक्षांचा दबाव झुगारला
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीनगर मानखुर्दचे उमेदवार म्हणून नवाब मलिक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अखेर पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्यात आला आहे. नवाब मलिक यावेळी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ बाकी असताना नवाब मलिक त्यांच्या अर्जासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म जोडला आहे. मानखुर्द शिवाजीनगर मध्ये आता नवाब मलिक विरुद्ध समाजवादी पार्टीचे अबू आझमी असा सामना होणार आहे.
भाजप आणि शिवसेनेकडून नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपकडून दबाव टाकण्यात आला होता. नवाब मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आला होता ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून लपवण्यात आली होती. नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म होता मात्र त्यांनी भरला नव्हता. पक्षाकडून सांगण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडला.
आज मी शिवाजीनगर मानखुर्द क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. 2 वाजून 55 मिनिटांनी पक्षाचा एबी फॉर्म भरला आहे. त्यामुळं मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
महायुतीपुढं नवं आव्हान
नवाब मलिक यांच्या विरोधात गेल्या काही वर्षांमध्ये आरोप करणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नवाब मलिक यांचा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार करावा लागू शकतो. पुढच्या कालावधीत ज्यांच्यावर आरोप केले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ महायुतीच्या कार्यकर्त्यांवर येणार आहे. महायुतीसाठी नवाब मलिकांच्या उमेदवारीचा मुद्दा आव्हानात्मक ठरणार आहे.
राष्ट्रवादी विरुद्ध सपा असा सामना
मानखुर्द शिवाजीनगरला नवाब मलिक विरुद्ध अबु आझमी अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीत ही जागा समाजवादी पार्टीसाठी सोडण्यात आली आहे. या ठिकाणी समाजवादी पार्टीकडून अबू आझमी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवाब मलिक यांनी अणूशक्तीनगर मतदारसंघ लेकीसाठी सोडला आहे. या मतदारसंघातून सना मलिक विधानसभा निवडणूक लढत आहेत. नवाब मलिक यांनीयापूर्वी अणूशक्तीनगरचे आमदार म्हणून काम केलं आहे.
इतर बातम्या :