अमरावतीत रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष महाआघाडीसोबत, नवनीत राणा लढणार
मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पराभव केला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी न थांबता गेली पाच वर्ष अमरावती जिल्हा पिंजून काढला आणि आपले काम सुरु ठेवले होते.
अमरावती : अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्यासाठी अमरावतीची जागाही सोडावी अशी विनंती रवी राणा यांनी केली आहे. त्यामुळे अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यात लोकसभेची लढत होण्याची शक्यता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा विश्वास दाखवू शकते. याबाबतची अधिकृत घोषणा 19 किंवा 20 मार्चला केली जाणार आहे, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. नवनीत राणा स्वत:च्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पराभव केला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी न थांबता गेली पाच वर्ष अमरावती जिल्हा पिंजून काढला आणि आपले काम सुरु ठेवले होते. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवदीने युवा स्वाभिमान पार्टीला महाआघाडीत सामावून घेऊ शकते.
नवनीत राणा यांनी गेल्या पाच वर्षात मोठा जनसंपर्क वाढवला आहे. याचा आढावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला आहे. मागील निवडणुकीत थोड्या मतांनी नवनीत राणा यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. मात्र सध्या युवा स्वाभिमानी पक्षाचं अमरावतीत पारडं जड आहे. त्यामुळे युवा स्वाभिमानी पक्षाला पाठिंबा देऊन नवनीत राणा यांना विजयी करावं, अशी विनंती रवी राणा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केली आहे.