Naresh Mhaske :भिवंडीची निवडणूक धर्मयुद्ध, शहरात पुन्हा भगवे कंदील झळकवायचे : नरेश म्हस्के
Naresh Mhaske : भिवंडीमधील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
Naresh Mhaske : भिवंडी शहरात भगवे कंदील लावण्याची शेवटची संधी मिळाली आहे.त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक धर्मयुद्ध समजून सैनिकासारखं काम करायचे आहे, असं खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी म्हटलं आहे. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील (Bhiwandi Assembly Constituency) महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नरेश म्हस्के बोलत होते. नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले माजी आमदार रुपेश म्हात्रे,भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार महेश चौघुले यांसह महायुतीमधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरेश म्हस्के यांनी यावेळी महाविकास आघाडीवर घणाघात केल्याचं पाहायला मिळालं. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख हे आमदार आहेत. नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावरही जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. नरेश म्हस्के यांच्या या वक्तव्यामुळे भिवंडीमधील निवडणुकांमध्ये धर्माचा मुद्दा वारंवार अधोरेखित होत असल्याचं चित्र आहे.
मुंबईचा नगरसेवक भिवंडीत आमदार होतो - नरेश म्हस्के
आता मुंबईचं पार्सल परत पाठवायचं आहे. मुंबईचा नगरसेवक भिवंडीत आमदार होतो, मग भिवंडीत जन्माला आलेले संतोष शेट्टी बाहेरचे कसे ठरले असा सवाल म्हस्केंनी केला आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हजारो लाभार्थी मतदारसंघात आहेत .प्रचार रॅली सोबतच या लाभार्थ्यांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचणे गरजेचे आहे.या योजनेचा लाभ सर्वधर्मीय महिलांना मिळाला तेव्हा मुख्यमंत्री यांनी कोणताही भेदभाव केला नाही.ठाणे शहरासारखे भिवंडी शहराला बनवायचे असेल तर महायुती विजयी झाली पाहिजे
भिवंडी पुन्हा भगवीमय करावयाची आहे - नरेश म्हस्के
मी जिथे असतो तेथे प्रामाणिक असतो,संघर्ष करून पक्ष वाढीच काम केले. ठाकरे गटामध्ये असताना तेथे काम केले. पण शेवटच्या क्षणी त्यांनी दगा दिला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मदतीचा हात दिला.भिवंडी शहराच्या विकासासाठी मला आश्वासन दिले.मी अपक्ष उभा राहिल्याने पुन्हा मतांमध्ये मतविभागणी होऊन बाहेरच्या कोणाच्या हाती भिवंडी जाऊ नये,भिवंडी पुन्हा भगवीमय करण्यासाठी संतोष शेट्टी यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला, असं नरेश म्हस्के म्हणाले.
ही बातमी वाचा :
सोलापुरात काँग्रेसला हादरा! 5 माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश