'शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; तेलही गेले, तूपही गेले...'; निकालानंतर मनसेची खोचक ट्वीका
Rajya Sabha Election :मनसेकडून राज्यसभा निकालावर प्रतिक्रिया आली असून शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले अशी खोचक टीका मनसेनं केली.
MNS After Rajya Sabha Election Result: राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल (Maharashtra Rajya Sabha Election 2022) जाहीर झाला. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले. सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या सामन्यात भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. मध्यरात्रीच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर निकालाचं चित्र स्पष्ट झालं. या निकालानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर एकमेव आमदार असलेल्या मनसेकडून देखील प्रतिक्रिया आली असून शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले अशी खोचक टीका मनसेनं केलीय.
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली. तेल गेले,तूप गेले आणि हाती धुपाटणे आले. विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला, असं काळे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली ...
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 11, 2022
तेल गेले,तूप गेले आणि हाती धुपाटणे आले ...
विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला ...
तर संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022
या निकालात धनंजय महाडिक यांना 41.5 मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय पवार यांना 33 मतं मिळाली तर संजय राऊतांना 41 मतं मिळाली. राज्यसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेली मतं पाहता महाविकास आघाडीची चिंता निश्चितपणे वाढली आहे. या निवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिला होता. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपला समर्थनं दिलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय |