जिथं जरागेंनी मराठा आंदोलन उभं केलं तिथंच ओबीसी नेता वरचढ, अंतरवालीत महादेव जानकरांना लीड!
मराठा आरक्षण आंदोलनालामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अंतरवाली सराटी हे गाव चर्चेच्या केंद्रस्थानी होते. या गावातून कोणाला मते मिळाली असे विचारले जात होते.
मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024 Result) संपूर्ण देशाचे महाराष्ट्रावर लक्ष होते. महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. गेल्या दोन ते तीन वर्षांत बदलेली राजकीय परिस्थिती, शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) यासारख्या महत्त्वाच्या पक्षांची झालेली शकलं आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाला (Marathi Reservation) मिळालेली हवा यामुळे यावेळी निवडणुकीचे सगळे गणित बदलले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाचा या निवडणुकीवर मोठा परिणाम पडणार, असं सांगितलं जात होतं. त्याचा परिणाम प्रत्यक्षात दिसलादेखील. सत्ताधारी महायुतीला या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसला. पण ज्या ठिकाणी हे मराठा आरक्षण उभं राहिलं, जे ठिकाण मराठा आरक्षणाच्या लढ्याचं केंद्र ठरलं, त्याच अंतरवाली सराटीत मात्र ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या उमेदवाराला पसंती मिळाली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे अंतरावाली सराटीला वलय
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथूनच मराठा आरक्षणाचा लढा उभा केला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या एका मागणीसाठी ते गेल्या कित्येक महिन्यांपासून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतायत. त्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी उपोषणही केले. जरांगे यांना मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला. जरांगे म्हणतील तसं आम्ही करू, अशीच मराठवाडा आणि इतर भागातील मराठ्यांची होती. त्यामुळे सरकारवरही दबाव वाढला होता. अंतरवाली सराटीत बसून मनोज जरांगे जे म्हणतील तेच आम्ही करू अशी मराठा समाजाची भूमिका होती. त्यामुळे या गावालाही तेवढेच महत्त्व आले होते. जरांगे यांना समजावून सांगण्यासाठी आमदार, खासदार, मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांनाही या गावात जावे लागले. त्यामुळे या गावाला संपूर्ण राज्यात वलय निर्माण झाले होते.
परभणीत संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर
याच कारणामुळे अंतरावाली या छोट्याशा गावातील लोकांच्या मनात काय आहे? येथील मतदार नेमकं कोणाला मतदान करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता लोकसभेची निवडणूक संपली आहे. अंतरावाली सराटी या गावाचा परभणी लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. परभणी शहरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय जाधव विरुद्ध महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात लढत झाली. संजय जाधव हे मराठा समाजातून येतात तर जानकर हे ओबीसी समाजाचे नेतृत्त्व करतात. अशा स्थितीत अंतरवाली सराटी हे गाव कोणाच्या पाठीशी उभे राहते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर जरांगेंनी ज्या ठिकाणी मराठा आंदोलन उभे केले त्या अंतरवालीने जानकर यांना आघाडी दिल्याचे समोर आले आहे.
अंतरवाली सराटीत कोणाला किती मते?
अंतरवाली सराटीमध्ये एकूण 1160 एवढं मतदान झालं होतं. यापैकी विद्यमान खासदार संजय जाधव यांना 531 एवढी मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 629 एवढी मतं मिळाली. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलन स्थळी ओबीसी उमेदवार असणाऱ्या महादेव जाणकरांना 98 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे अंतरावाली सराटीतील मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा :
अजितदादांचे 18-19 आमदार खरंच शरद पवारांकडे परतणार? जयंत पाटलांनी एका वाक्यात सगळं सांगितलं!