प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीला आंबेडकरांच्या समर्थकांकडून मारहाण
सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध लिहिणाऱ्यांना मारायचे आदेश मी दिलेले नाहीत. झालेल्या घटनेचा मी देखील निषेध करतो, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वृद्ध व्यक्तीस आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. भाई रजनीकांत असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. भाई रजनीकांत हे अकोल्यातील समाजवादी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. रजनीकांत यांनी लिहिलेल्या तीन पोस्टमुळे आंबेडकर समर्थक संतोष कोल्हेंनी त्यांना मारहाण केली.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील बस स्थानकासमोरील एका चहा टपरीवर ही मारहाण झाली. व्यवसायानं वकील असलेले संतोष कोल्हे दर्यापूर नगरपालिकेत नगरसेवक होते. मात्र काही दिवसांपूर्वीच भाजपातून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध लिहिणाऱ्यांना मारायचे आदेश मी दिलेले नाहीत. झालेल्या घटनेचा मी देखील निषेध करतो. मात्र सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांनीही विचारपूर्वक लिहावं. कारण अशा घटनांनंतर केवळ मारणार दिसतो, पोस्ट लिहाणारा दिसत नाही. आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही. अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
दरम्यान, 'आपल्याला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा', असं विधान प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी अकोल्यात केलं होतं. त्याची प्रचिती आज अमरावतीमध्ये आली आहे. आंबेडकरांच्या विरोधात भाई रजनीकांत सोशल मीडियावर सातत्याने लिहीत होते. त्यामुळेच अखेर त्यांना मारहाण केल्याचं मारहाण करणाऱ्या संतोष कोल्हेंनी म्हटलं आहे.