(Source: Poll of Polls)
Maharashtra vidhan sabha election 2024: मुंबईतील मुस्लीमबहुल भागांमध्ये भरभरुन मतदान, महायुतीला पुन्हा लोकसभेसारखा फटका बसणार?
Maharashtra vidhan sabha election Voting turnout: मुंबईतील मुस्लीमबहुल भागांमध्ये भरभरुन मतदान. महायुतीला फटका बसण्याची शक्यता
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली. लोकसभा निवडणुकीला राज्यात मतदारांचा निरुत्साह दिसून आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का (Maharashtra Vidhan Sabha Voting Turnout) वाढल्याचे दिसून आले. बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्या आसपास होती. त्यामुळे अंतिम आकडेवारीत मतदानाच्या टक्क्यात भर पडून तो 68 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत 61.29 टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागात नेहमीप्रमाणे मतदानाकडे नागरिकांना पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना करुनही मुंबई आणि उपनगरातील मतदानाचा टक्का (Mumbai Voting Percentage) किंचित वाढण्यापलीकडे फार काही साध्य झाले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुंबईत मुस्लीम मतदारांनी (Muslim Voters) भरभरुन केलेले मतदान हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात अंदाजे 50 ते 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज आहे. मुस्लीमबहुल भागांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले. चांदिवली, जोगेश्वरी, फिल्टरपाडा, आग्रीपाडा, पठाणवाडी, नागपाडा, भायखळा या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. लोकसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल भागांमधील मतदानाने अनेक मतदारसंघांचा निकाल फिरवला होता. अन्य मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लीड असूनही केवळ एका मुस्लीमबहुल मतदारसंघात मविआच्या उमेदवारांना झालेल्या एकगठ्ठा मतदानामुळे मालेगाव, ईशान्य मुंबई या मतदारसंघातील निकाल बदलला होता.
आता विधानसभा निवडणुकीतही मुस्लीम समुदायाने भरभरुन मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच महायुतीला या मतदानाचा फटका बसणार का, हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल. दरम्यान, राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात झाले. याठिकाणी समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात लढाई होती. याठिकाणी तब्बल 81 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. तर राज्यात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी 41 टक्के मतदान झाले. तर मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या कुलाबा विधानसभेतही अवघे 45 टक्के मतदान झाले.
मुंबईत मतदानाची काय स्थिती?
दुपारच्या सत्रानंतर मतदान काहीसं वाढलेलं दिसलं. संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान सर्वाधिक मतदान झालं. अंतिम आकडेवारीनुसार, मुंबईत 56 टक्के मतदान झालं. यात सर्वाधिक 62 टक्के मतदान भांडूप पश्चिम मतदारसंघात झाले असून बोरीवली आणि मुलुंडमध्येही 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांदिवलीमध्ये सर्वात कमी 48 टक्के मतदान झालं आहे. वडाळा मतदारसंघात सर्वाधिक 58 टक्के, तर कुलाब्यात सर्वांत कमी ४५ टक्के मतदान झालं.
आणखी वाचा
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?