Shankar Jagtap: घराणेशाहीचा मुद्दा अडचणीचा ठरेल? प्राचाराची सांगता करताना शंकर जगताप म्हणाले 'संधी फक्त कर्तृत्वावर...'
Shankar Jagtap: चिंचवडमधील भाजपचे उमेदवार शंकर जगताप बाईक रॅली काढता आहेत. याद्वारे ते मतदारांना साद घालत आहेत.
पुणे: प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत, तत्पूर्वी चिंचवडमधील भाजपचे उमेदवार शंकर जगताप बाईक रॅली काढता आहेत. याद्वारे ते मतदारांना साद घालत आहेत. विरोधकांवर भाष्य न करता, केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. घराणेशाही हा मुद्दा अजिबात अडचणीचा नसेल, उलट विरोधी उमेदवारांनी कुटुंबाचा राजकीय प्रवास पहावा, असा पलटवार शंकर जगतापांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. त्याचबरोबर यावेळी निवडणुकीच्या प्रचारामध्ये विरोधकांवर न बोलता विकाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणालेत शंकर जगताप?
पिंपरी चिंचवडमध्ये आज महायुतीचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांनी बाईक रॅली काढत प्रचार सुरू केला. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विरोधकांनी जगताप यांच्या वर हल्लाबोल करत घराणेशाही वर भाष्य केलं होतं. तो मुद्दा खोडून काढत शंकर जगताप म्हणाले, घराणेशाहीचा मुद्दा इथे येतच नाही. त्यांचं (लक्ष्मण जगताप) अकाली निधन झाल्यामुळे मला किंवा अश्विनी जगताप यांना संधी देण्यात आली होती.
आम्ही विरोधकांसारखी घराणेशाही करत नाही. वडील, मग मुलं, मग भाऊ, वहिनी, झाल्या. त्यानंतर काका काकू झाल्या. अशा पद्धतीची घराणेशाही आमच्याकडे नाही. जर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं अकाली निधन झालं नसतं. तर आम्हा दोघांना पण संधी मिळाली नसती आणि ही संधी फक्त कर्तृत्वावर मिळालेले आहे. आतापर्यंत मतदार संघामध्ये केलेल्या कामामुळे मिळालेली आहे. 25-30 वर्ष भाऊंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण काम करत होतो. समाजसेवा करत होतो 2007 ते 2012 मी नगरसेवक होतो आणि तेव्हापासून राजकारण असेल किंवा समाजकारण असेल आम्ही त्यामध्ये सर्वजण सक्रिय होते असं शंकर जगताप यांनी एबीपी माझा शी बोलताना म्हटलं आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
आज राज्यभरातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावतील. त्याआधी आज दिवसभरात सांगता सभा, आणि शेवटचा प्रचार होणार आहे. आज दिवसभरात नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आज अनेक ठिकाणी रोड शो होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबेल, त्यामुळे उमेदवार आज आपली पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा राज ठाकरे यांसारखे प्रमुख नेते, रोड शोच्या माध्यमातून आपली ताकद दाखवत आहेत.