Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात मतदान कधी? निकाल कधी? जाणून घ्या एका क्लिकवर
North Maharashtra Elections 2024 Date : राज्यातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार? याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
Maharashtra Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार. दोन्ही राज्याच्या लोकांनी जो उत्साह दाखवला आहे. तो कायमस्वरुपी लक्षात राहील. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. महाराष्ट्रात 1 लाख 158 मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र आहेत.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यात एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत. उत्तर महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे. या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
- निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
- अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
- अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
- मतदान :20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
- निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
288 जागांसाठी किती मतदार असतील?
- एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख
- नव मतदार - 20.93 लाख
- पुरूष मतदार - 4.97 कोटी
- महिला मतदार - 4.66 कोटी
- युवा मतदार - 1.85 कोटी
- तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
- 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
- शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
- दिव्यांग मतदार - 6.32 लाख
महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?
- एकूण मतदान केंद्र - 1 लाख 186
- शहरी मतदार केंद्र - 42,604
- ग्रामीण मतदार केंद्र - 57,582
- एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार - 960
मतदारांसाठी सुविधा पोर्टल अॅप
दरम्यान, निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या