(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon police seize Money: पुण्यानंतर आता जळगावमध्ये सापडलं कोटींचं घबाड; व्हिडिओ शेअर करत रोहित पवार म्हणाले, 'गुजरातची...'
Jalgaon police seize Money: जळगावच्या अमळनेर तालुक्यातील चोपडाई येथे तपासणी नाक्यावर घबाड सापडले आहेत. पोलिसांच्या तपासा दरम्यान एरंडोल तालुक्यात कासोदा गाव येथे एका कारमध्ये दीड कोटीची रोकड तपासणी दरम्यान सापडली आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुका जाहीर होताच अनेक ठिकाणी नाकाबंदी आणि सुरक्षेसाठी गाड्या तपासताना पैसे सापडण्याच्या घटना आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. पुण्यातील खेड-शिवापूरमध्ये एका गाडीतून 5 कोटी रक्कम सापडल्याने राजकारण तापलं असतानाच आता जळगावजवळही असाच प्रकार उघडकीस आला आहे. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील चोपडाई येथे तपासणी नाक्यावर घबाड सापडले आहेत. पोलिसांच्या तपासा दरम्यान एरंडोल तालुक्यात कासोदा गाव येथे एका कारमध्ये दीड कोटीची रोकड तपासणी दरम्यान सापडली आहे. यामुळे एकच खळबळ उडालीय या प्रकरणावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. "दलालीच्या खोक्यांचा पुढचा अंक जळगावमधल्या एरंडोल मध्ये दिसला.गद्दार विकत घेतले म्हणून महाराष्ट्र विकत घेता येईल असा कोणाचा समज असेल तर मग त्यांचा अभ्यास कच्चा म्हणावा लागेल.इथे गुजरातची स्टाईल चालणार नाही, महाराष्ट्र-द्रोह्यांना हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की !", अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
दलालीच्या खोक्यांचा पुढचा अंक जळगावमधल्या एरंडोल मध्ये दिसला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 24, 2024
गद्दार विकत घेतले म्हणून महाराष्ट्र विकत घेता येईल असा कोणाचा समज असेल तर मग त्यांचा अभ्यास कच्चा म्हणावा लागेल.
इथे गुजरातची स्टाईल चालणार नाही, महाराष्ट्र-द्रोह्यांना हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र… https://t.co/xLSBoQd9oU pic.twitter.com/ujp3wEF75z
काय आहे प्रकरण?
एरंडोल तालुक्यात कासोदा गाव येथे एका कारमध्ये दीड कोटीची रोकड तपासणी दरम्यान सापडली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान कारमधून तब्बल दीड कोटींची रोकड जप्त केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली.
याबबात मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबलेले होते. याचवेळी एका क्रेटा कारची तपासणी करताना पोलिसांना तब्बल एक कोटी 45 लाखाची रोकड सापडली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती? याचा खुलासा होऊ शकला नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत.
पुण्यात सापडली होती 5 कोटीची रक्कम
पुण्यात पाच कोटींची रोकड सापडली त्यानंतर राजकीय वातावरण तापलं. खेड-शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या रकमेबाबत पोलीस, निवडणूक विभाग आणि इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगलं होतं. MH 45 - AS 2526 या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली. या पैशांचं सांगोला कनेक्शन समोर आल्यानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी विरोधकांनी संबंध जोडला.