Eknath Shinde: भाजपसोबत का गेलो? एकनाथ शिदेंनी सांगितलं कारण, म्हणाले, 'मी ठाकरेंना सांगत होतो..... '
Eknath Shinde: एबीपी माझा घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत का गेले आणि तेव्हा नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच प्रचारादरम्यानचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे, ते म्हणजे "मला तुम्ही हलक्यात घेतलं. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. आम्ही शिवसेना वाचवली. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला," असं मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) विक्रोळीत प्रचारसभेच्या दरम्यान म्हटलं आहे. तर त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांनी एबीपी माझा घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या या वक्तव्याचं त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. त्याचबरोबर भाजपसोबत जाण्याचं कारण देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणालेत एकनाथ शिंदे?
तुमचं एक वाक्य चांगलंच गाजतंय ते म्हणजे मला हलक्यात घेतलं आणि मी सरकार उलटवलं, हलक्यात घेणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्यांना सांगत होतो. आपण शिवसेना भाजप म्हणून लढलो आहे. आपण मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून प्रचार केला आहे आणि लोकांनी त्यामुळे आपल्याला मतदान केलं आहे. पुन्हा आपण शिवसेना भाजप असं सरकार आणूया पुन्हा सगळं झालं गेलेले विसरून जाऊयात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
जर भाजपा शिवसेना सरकार झाला असता तर मी मुख्यमंत्री झालो असतो का? नाही, पण मग त्यावेळेस त्यांना (ठाकरेंना) असं वाटलं असेल हा काय बोलतो आहे, याला काय महत्त्व द्यायचं, याला काय माहिती आहे आणि मग जेव्हा आम्ही तीन चार पाच वेळा बोललो आणि जेव्हा मला कळलं आता काही बदल होणार नाही. त्यानंतर काही आमदार माझ्यासोबत होते तेही आग्रही होते .त्यांना भीती होती. आम्ही काय फेस करणार निवडणूक होती. कशी लढवणार कोणत्या मुद्द्यावर आम्ही ती निवडणूक लढवणार आणि आम्ही मतदारसंघांमध्ये काय काम करणार, फंड मिळत नाही, तिकडे विचारधारा सोडली मग आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत- एकनाथ शिंदे
सुवर्णा करंजे यांच्या प्रचारासाठी विक्रोळीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'मला तुम्ही हलक्यात घेतलं. त्याचे परिणाम आता तुम्हाला दिसत आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. आम्ही शिवसेना वाचवली. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही सुडाचे राजकारण कधीच करत नाही. नारायण राणे यांना जेलमध्ये टाकत नाही. पत्रकारांना जेलमध्ये टाकत नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या नवनीत राणांना जेलमध्ये टाकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि इतर चार पाच जणांची नावे कारवाईसाठी होती. पण आम्ही विरोध करत सरकार पाडून टाकले आणि आपल्याला अपेक्षित सरकार आणलं'.