Nawab Malik: 'अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतो...' अजितदादा प्रचार करणार समजताच नवाब मलिकांकडून तोंडभरून कौतुक!
Nawab Malik: महायुतीतील भाजपचा विरोध झुगारून आपल्याला उमेदवारी दिली आणि आता प्रचारात देखील उतरणार आहे याबाबत बोलताना मलिकांनी अजित पवारांचं कौतुक करत दिलेला शब्द दादा पाळतात असं म्हटलं आहे.
पुणे: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते नवाब मलिक यांना महायुतीने विरोध केला असला तरी देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहेत. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी नवाब मलिक यांनी पाठिंबा दिला असून ते मलिकांचा प्रचार देखील करणार आहेत. नवाब मलिक काही महिन्यांपूर्वी तुरुंगात होते. त्याआधी भाजपने त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. भाजपाने आम्ही नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. महायुतीतील भाजपचा विरोध झुगारून आपल्याला उमेदवारी दिली आणि आता प्रचारात देखील उतरणार आहे याबाबत बोलताना मलिकांनी अजित पवारांचं कौतुक करत दिलेला शब्द दादा पाळतात असं म्हटलं आहे.
अजित पवार हा मर्द माणूस आहेत. ते जो शब्द देतात तो शब्द दादा पाळतात. आमच्या कठीण काळात पाठीशी ते उभे राहिले आणि आम्हाला उमेदवारी देखील दिली. आता महायुती आणि महाविकास आघाडी माझ्या विरोधात आहे. मात्र, जनता माझ्यासोबत आहे, असंही पुढे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
अबू आझमींना दिलं उत्तर
माझा जावई समीर आता आमच्यासोबत नाही. एखादी केस एखादा व्यक्ती गेल्यानंतर संपते. मात्र, आम्ही ती केस संपली हे कधीच स्वीकारणार नाही. आम्ही कोर्टासमोर ती केस व्यवस्थित लढवणार आहे. त्यांच्यावर असलेला ठपका पुसल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अबू आझमी मृत झालेल्या माणसाबाबत बोलत आहेत. हे चुकीचं आहे. मी बोलायला सुरूवात केली, तर त्यांना जड जाईल. त्यांच्या भावाचा मुलगा काय करतो. तो कुणाचा राईट हँड आहे. इंटरनॅशनल ड्रग्ज माफिया कोण कुठं आहे हे सगळं मी उघड करू शकतो, असंही यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
अजित पवार मलिकांचा प्रचार करणार
अजित पवार आज (7 नोव्हेंबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना म्हणाले, "आम्ही नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना आम्ही घड्याळ हे चिन्हही दिलेलं आहे. आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये जाणारच ना. नवाब मलिक यांच्यावर आतापर्यंत फक्त आरोप झाले आहेत," असे अजित पवार म्हणाले. तसेच आरोप सिद्ध झाल्याशिवाय, त्यांना दोषी कसे ठरवता? असा सवालही त्यांनी केला आहे.
भाजपाने नवाब मलिकांवर गँगस्टर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे दाऊद आणि त्याच्या भावाच्या केसेसशी संबंध असलेल्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करणार नाही, असं भाजपाने मह्टलं आहे. याच भूमिकेमुळे भाजपाने सुरुवातीला मलिक यांना तिकीट देण्यास विरोध केला होता. मात्र दबाव झुगारून अजित पवार यांनी नवाब मलिक यांना तिकीट दिलेले आहे. मलिक यांची कन्या सना मलिक यादेखील अणुशक्तीनगर या मतदारसंघातून यावेळची विधानसभा निवडणूक लढवता आहेत. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द या जागेवरून अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.