Election : राडा, बोगस मतदान अन् पैशाचं आमिष दाखवून महिलांना कोंडून ठेवलं; राज्यातील 23 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मतदान पूर्ण
Maharashtra Nagarpalika Election : राज्यातील उर्वरित 23 नगरपंचायती, नगरपरिषदांसाठी मतदान पार पडलं असून रविवारी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं दिसून आलं.

मुंबई : राज्यातील 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान (Voting) पार पडलं असून मतदानाची अधिकृत वेळ संपली. मात्र, अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू राहिल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान, अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडत असलं तरी काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागलं. नांदेडमधील धर्माबादमध्ये महिलांना मंदिरात आणि मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना समोर आली. तर अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बोगस मतदान आणल्याचा आरोप भाजपने केला. रविवारी, 21 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
Ambernath Election : अंबरनाथमध्ये बोगस मतदान
अंबनाथमध्ये 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपनं शिंदेंच्या सेनेवर केला आहे. मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा आरोप भाजपच्या अभिजीत करंजुलेंनी केला आहे. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर काही वातावरण चांगलंच तापलं होतं.
अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसनेनं केला होता. यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तसंच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचंही पहायला मिळालं.
Nanded Election : नांदेडमध्ये मतदारांना कोंडून ठेवलं
नांदेडमधील धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. भाजपनं शेकडो मतदारांना पैशांचं आमिष दाखवून बोलावून घेतलं आणि कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला प्रसादाच्या स्वरूपात चार हजार रुपये देणार असल्याचं सांगून मंदिरात ठेवल्याचा आरोप महिलांनी केला. कप बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून डांबून ठेवल्याचा आऱोप महिलांचांनी केला. तुमच्या समाजाच्या नेत्यापाशी पैसे देतो म्हणून कुंभार समाजातील महिला नजर कैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला.
इनानी मंगल कार्यालयात डांबून ठेवलेल्या मतदारांची नंतर सुटका करण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईनानी मंगल कार्यालयात पाहणी केली. त्यावेळी तिथे कोणीही नागरिक किंवा त्याच्याशी संबंधित गैरप्रकार आढळल्या नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
धर्माबादमध्ये तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आला. बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एका महिला आणि पुरुषाला जोरदार मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मतदान केंद्रा बाहेर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
Kolhapur Election : कोल्हापुरात राडा
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील वार्ड क्रमांक तीन मधल्या एमआर हायस्कूल मतदान केंद्रावर वाद झाला. गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना मतदान केंद्रात का सोडले असा आक्षेप विरोधकांनी घेतला. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्य़े वाद झाला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावारण होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला.
Kopergaon Election : कोपरगावात मतदान केंद्रावर गोंधळ
कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली, मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात आला. पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक चकमक झाली. कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
Baramati Election : बारामतीमध्ये बोगस मतदान
बारामती नगरपालिकेसाठी आज मतदान होतं, यावेळी एका मतदाराच मतदानच आधी कोणीतरी करून गेलं असल्याचं समोर आलं आहे. बारामतीतील अहिल्यानगर देवी क्लब या मतदार केंद्रात हा प्रकार घडला. अमित दिलीप कुलथे यांचे मतदान आधीच झालं होतं. अमित कुलथे मतदान केंद्रात दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांच्याकडून निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॅार्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी मतदान केलं.
Chh Sambhajinagar Election : फुलंब्रीत जादूटोणा
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत ऐन मतदानादिवशी मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला. भारत माता शाळा मतदान केंद्राबाहेर काळी बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य आढळलं.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर नगर परिषदेच्या तीन जागांसाठी आज मतदान पार पडलं. सिन्नरच्या प्रभाग 2 च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडण्यात आलंय. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. भावाच्या जागेवर मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 2 मधील बोगस मतदार न वगळल्याने माजी नगरसेवकाकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आल्याचा प्रकार समोर आला. निवडणूक आयोग, पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडे बोगस नावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.




















