विनोद तावडेंच्या बॅगमध्ये माल होता म्हणून बॅग तपासली नाही का? सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Sushma Andhare on vinod tawde : सत्ताधाऱ्यांनी पैशांचा महापूर करायचा, यावर जर निवडणुका होत असतील तर उमेदवारी अर्ज भरणे, चिन्ह देणे ही सगळी नाटकं करण्याची गरज नसल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.
Sushma Andhare on vinod tawde : भाजपच्या वरिष्ठ नेत्याने जर असे पैसे वाटले तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण पारदर्शक पार पडेल असा विश्वास आम्ही कसा ठेवायचा? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप नेते विनोद तावडे (vinod tawde) यांच्यावर टीका केली. हेलिकॉप्टर हे फक्त विरोधकांचेच तपासायचे का? विनोद तावडेंचं यांचे तपासायचे नाही का? असा सवालही त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी पैशांचा महापूर करायचा, यावर जर निवडणुका होत असतील तर उमेदवारी अर्ज भरणे, चिन्ह देणे ही सगळी नाटकं करण्याची गरज नसल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. विनोद तावडेंच्या बॅगमध्ये माल होता म्हणून त्यांची बॅग तपासली नाही का? असा सवालही सुषमा अंधारेंनी केला.
भाजपच्या पायाखालची जमीन घसरलीय
भाजप घाबरली आहे म्हणून अनेक ठिकाणी डमी उमेदवार उभे केले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. सगळ्या यंत्रणा हाताशी धरुन निवडणुका लढल्या जात असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. निवडणूक आयोग भाजपचा घरगडी म्हणून काम करत असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या. आता भाजपच्या पायाखालची जमीन घसरली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ व्हायरल होतायेत की दीपक केसरकला पाडा असेही अंधारे म्हणाल्या. भाजपकडे जर खरच जनतेचा पाठिंबा असता तर त्यांना डमी उमेदवार उभं करण्याची गरज नसती असेही अंधारे म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट रोखून धरली आहे. या घटनेनंतर पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बविआच्या आरोपानुसार, विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती.