Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
Deolali Assembly Constituency : देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे, योगेश घोलप, राजश्री अहिरराव आणि अविनाश शिंदे अशी चौरंगी लढत होणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. मात्र शिवसेना शिंदे गटाने राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) यांना विशेष विमानाने एबी फॉर्म पाठवला होता. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अहिरराव यांचा अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न केले होते. मात्र राजश्री अहिरराव नॉट रिचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता देवळाली विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.
देवळाली मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चविषयक पहिली तपासणी ही खर्च निरीक्षक डॉ. पेरीयासामी एम. यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी सभागृहात पार पडली. या खर्च तपासणीसाठी सर्व 12 उमेदवार उपस्थित होते. प्रथम तपासणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी 4 लाख 83 हजार 384, वंचितच्या डॉ. अविनाश शिंदे यांनी 4 लाख 61 हजार 116 तर शिवसेना ठाकरे गटाच्या योगेश घोलप यांनी 4 लाख 37 हजार 796 तर शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांनी 1 लाख 19 हजार 408 इतका खर्च नोंदविला आहे.
खर्चात आढळली तफावत
विशेष म्हणजे राजश्री अहिरराव, सरोज अहिरे, योगेश घोलप, अविनाश शिंदे यांच्या खर्च तपासणीत तफावत आढळली आहे. त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावत खुलासा मागविला आहे. या बैठकीत खर्च निरीक्षक डॉ.पेरीयासामी यांनी सर्व उमेदवारांच्या नोंद वह्यांची तपासणी केली. विधानसभा निवडणुकीसाठी सध्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून खर्च केला जात आहे. त्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याने निवडणूक शाखेकडून निरीक्षकांमार्फत नोटिसा दिल्या जात आहेत.
उमेदवारांच्या खर्चात इतकी तफावत
- सरोज अहिरे 63,931 रुपये
- डॉ. राजश्री अहिरराव 4,040 रुपये
- योगेश घोलप 360 रुपये
- डॉ. अविनाश शिंदे 4,860 रुपये
- विनोद गवळी 150 रुपये
आणखी वाचा