(Source: ECI | ABP NEWS)
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
Prakash Ambedkar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे हेलिकॉप्टरमधून बाहेर येताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली.

वाशिम : यवतमाळ जिल्ह्यातील वणीमधल्या सभेसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे. बॅग तपासताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची, देवेंद्र फडणवीस, मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का? असा सवाल त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला. आता यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
प्रकाश आंबेडकरांचा टोला
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सगळ्यांच्या बॅग तपासल्या जातात. माझी देखील बॅग तपासली जाते. निवडणुकीच्या काळात बॅग तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहे. त्यात इश्यू करण्यात काही अर्थ नाही, असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संजय राऊतांचा आरोप
दरम्यान, उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय. आतापर्यंत या पथकाने किती जणांच्या तपासण्या केल्या. मोदी आणि शाह इथे रोज फिरत आहेत, तपासणी केली का? मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या देखील तपासण्या होत नाहीत. त्यांच्या हेलिकॉप्टर आणि वाहनातून पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप सुरु आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मोदी-शाहांची बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर जाहीर सभेतून जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलंय की, मी प्रचाराला आल्यानंतर सात ते आठ अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथे कुठे नाकानाक्यावर अडवतील तिथे-तिथे तपास अधिकाऱ्यांचे खिसे तपासा. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकाऱ्यांवर रागावलो नाही. पण त्यांनी जशी माझी बॅग तपासली, तशी मोदी-शाहांची बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे. त्यांचीच नव्हे तर दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटसह टरबुजाचीही (फडणवीस) बॅग तपासण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा





















