नाशिकच्या नांदगावात नामसाधर्म्याचा रायगड- दिंडोरी पॅटर्न रिटर्न, सेनेचे सुहास कांदे विरुद्ध अपक्ष सुहास कांदे रिंगणात, कुणाचे वांदे होणार?
Suhas Kande : नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुहास कांदे यानं अर्ज दाखल केला आहे. नांदगावात सेनेचे सुहास कांदे रिंगणात आहेत.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघात एकसारखी नावं असलेले उमेदवार रिंगणात होते. दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे यांच्या विरोधात भास्कर भगरे सर नावाचा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होता. लोकसभा निवडणुकीला दिंडोरीतून निवडणूक लढवणाऱ्या भास्कर भगरे या अपक्ष उमेदवाराला एक लाखांहून अधिक मतं मिळाली होती. तोच दिंडोरी पॅटर्न आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत राबवला जात आहे. सारख्या नावाचे उमेदवार उभं करण्यास सुरुवात रायगड मध्ये झाली होती. आता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे नावाच्या अपक्ष व्यक्तीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुहास द्वारकानाथ कांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर नाम साधर्म्य असलेल्या सुहास बाबुराव कांदे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाम साधर्म्य ठेऊन भुजबळांनी युतीचे उमेदवार सुहास कांदे यांना अडचणीत आणण्यासाठी ही राजकीय खेळी केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुहास कांदे यांना नांदगाव तहसील कार्यालयातून बाहेर जाण्यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नांदगाव तहसील कार्यालयाच्या आवारत समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदे समर्थक होते. त्यावेळी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
अर्ज दाखल करुन अपक्ष उमेदवार सुहास कांदे समीर भुजबळ यांच्या गाडीतून रवाना
नांदगाव विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात सुहास बाबुराव कांदे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर अपक्ष उमेदवार सुहास कांदे हे समीर भुजबळ यांच्या गाडीतून अर्ज दाखल करून रवाना झाले. अपक्ष उमेदवार सुहास कांदे यांनी अर्ज दाखल करण्यामागं छगन भुजबळ असल्याचा आरोप केला.
नांदगावच्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे अन् समीर भुजबळ आमने सामने
नांदगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे रिंगणात आहेत. तर, नांदगाव भयमुक्त करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं नांदगाव विधानसभा मतदारसंघ देखील राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेई पर्यंत नांदगावमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतील.
इतर बातम्या :
एकनाथ शिंदेंचा धमाका, अजित पवारांच्या दोन उमेदवारांविरुद्ध हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले!