Bhosri Vidhansabha election 2024 : भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
Bhosri Vidhansabha election 2024 : भाजपने या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदार महेश लांडगे यांना तिकीट दिले आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या पक्षाने अजित गव्हाणेंना निवडणुकीत उतरवलं आहे.
पुणे : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा केली असून प्रचार देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील भोसरी मतदारसंघात देखी प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाचे (BJP) महेश किसन लांडगे करत आहेत, ते या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2009मध्ये अपक्ष उमेदवाराने ही जागा जिंकली होती. तर 2014 मध्ये महेश किसन लांडगे हे अपक्ष म्हणून लढताना विजयी झाले होते. विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांना भाजपने तिकीट दिले आणि पुन्हा एकदा ही जागा जिंकली. या मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा महेश किसन लांडगे यांना उमेदवारी दिली आहे.
भोसरीतील बंडखोरी शमली
शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील बंडखोरी शमली आहे. भोसरी मतदारसंघ शरद पवार यांच्या पक्षाला मिळाला आणि अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्यास महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता असल्याने रवी लांडगे यांनी अजित गव्हाणे यांना पाठिंबा देत आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याचे सांगितले.
भोसरीतील लढत महायुतीतील भाजप विरूध्द महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी होणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदार महेश लांडगे पुन्हा एकदा हॅट्ट्रिक साधणार की महाविकास आघाडी विजय मिळवणार, २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. मात्र, दोन्ही उमेदवार भोसरीतीलच असून स्थानिक असल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे भोसरीचा कोण जिंकणार याचीच उत्सुकता अधिक वाढली आहे.
उमेदवारांची नावे
महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?
भाजपचे महेश लांडगे यांना 159,295 मते मिळाली (विजयी) होती, तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना 81,728 मते मिळाली. 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे महेश लांडगे विजयी झाले होते.