Amol Kolhe : नियम फक्त विरोधी पक्षांनाच अन् सत्ताधाऱ्यांना मोकळं रान अमान्य, उद्धव ठाकरेंनंतर मविआचे खासदार अमोल कोल्हेंचा व्हिडीओ पोस्ट करत सवाल
Amol Kolhe : उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी यवतमाळमध्ये करण्यात आल्यानंतर सांगलीतील विटा येथे अमोल कोल्हे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.
सांगली : निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणं विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून आयोगाचे कर्मचारी कार्यरत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्य बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी वणीमध्ये करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ पोस्ट करुन त्यांच्या बॅगा देखील तपासण्यात आल्याची माहिती दिली आहे.यावेळी अमोल कोल्हे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अमोल कोल्हे यांनी सांगलीतील विटा येथील सभेत बोलताना याबाबत माहिती दिली.
कायदा आहे तर तो सर्वांनाच असावा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. ते म्हणाले,"आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे !" . विशेष बाब म्हणजे अमोल कोल्हे यांनी या पोस्टच्यमाध्यमातून दुसऱ्यांदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याची माहिती दिली.
आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 11, 2024
नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो… pic.twitter.com/BK48pCmJel
उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी
आज यवतमाळच्या वणी मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे हेलीपॅड आल्यानंतर निवडणूक विभागाच्या भरारी पथकांकडून हेलिकॉप्टरची आणि साहित्याची तपासणी करण्यात आली. याचा व्हिडिओ स्वतः उद्धव ठाकरे यांनी शूट केला. यासंदर्भात भरारी पथक प्रमुख यांच्याशी आणि पोलीस विभागाची संपर्क साधला असता त्यांनी या विषयावरती बोलण्यास नकार दिला.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधला असता ही जी सर्व कार्यवाही निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच करण्यात येते. तसेच दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने आले असतात त्यांच्याही हेलिकॉप्टरची आणि साहित्याची तपासणी करण्यात आली, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
रोहित पवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांच्या बॅगा चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली असली तरी प्रशासनाने महायुतीच्या नेत्यांचे तसेच गुजरात आणि दिल्लीतून येणारे हेलिकॉप्टर आणि विमाने चेक केल्यास प्रशासनाच्या हाती निराशा लागणार नाही हे नक्की आहे. हे दळभद्री सरकार महाराष्ट्राच्या युवांना रोजगार तर देऊ शकलं नाही, परंतु हेलिकॉप्टर चेक करण्याच्या निमित्ताने मध्यप्रदेशच्या कॅमेरामॅनला मात्र रोजगार देत आहे, याचा आनंद आहे, असं रोहित पवार म्हणाले.
इतर बातम्या :