Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘लाडकी लेक’ देणार बापाला टक्कर, कोण बाजी मारणार?
गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. मात्र, आत्राम यांनी आता अजित पवार गटात तर मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनीशरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील पूर्णपणे बदलली आहेत.
गडचिरोली : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय नेतेमंडळी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील झाल्याचं पाहायला मिळालं.अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात ते आहेत. आता त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाकडून मैदानात उतरणार आहे. यामुळे यंदा या मतदार संघात बाप-लेकीची लढाई रंगणार आहे.या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वडिलांविरुद्ध मुलगी अशी लढत बघायला मिळणार आहे
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे युती असो की आघाडी, या दोघांनीही अहेरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. मात्र, आत्राम यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील पूर्णपणे बदलली आहेत.
अहेरी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?
अहेरी विधानसभा मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणता येणार नाही. मात्र, या मतदारसंघात नेहमीच काँग्रेस आणि अपक्ष आमदारांचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात अहेरी, भामरागड, इटापल्ली, मुलचेरा आणि सिरोंचा या तालुक्याचा समावेश होतो. या मतदारसंघाची निर्मिती 1952 साली करण्यात आली होती. काँग्रेसचे नामदेवराव पोरेड्डीवार या मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यानंतर 1957 आणि 1962 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजे विश्वेश्वरराव यांचा, तर 1967 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अपक्ष उमेदवार जे. वाय. साखरे यांचा विजय झाला. 1972 मध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला. मुकूंदराव अलोने आमदार झाले. मात्र, 1978 मध्ये हा मतदारसंघ पुन्हा अपक्ष, 1980 मध्ये पुन्हा काँग्रेस, 1985 पुन्हा अपक्ष, 1990 मध्ये पुन्हा काँग्रेस यांच्या ताब्यात गेला. 1995 मध्ये नागविदर्भ आंदोलन समितीचे सत्यवानराव आत्राम हे या मतदारसंघाचे आमदार झाले. 1999 साली गोंडवाना गणतंत्र पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम निवडून आले. पुढे याच धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2004 साली ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. 2009 साली हा मतदारसंघ अपक्षांच्या ताब्यात गेला. मात्र, 2014 साली ऐतिहासिक कामगिरी करत भाजपाने पहिल्यांदा या मतदारसंघावर विजय मिळवला. अंबरिशराव आत्राम हे आमदार झाले, पण 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा आत्राम यांनी पुन्हा विजय मिळवला.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?
2014 च्या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला होता. अंबरिशराव आत्राम हे आमदार झाले होते, त्यांना एकूण 56 हजार 418 मते मिळाली होती; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम हे दुसऱ्या स्थानावर राहिले, त्यांना 36 हजार 560 मते मिळाली होती. या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या अपक्ष उमेदवार दीपकदादा आत्राम यांना 33 हजार 555, तर चौथ्या स्थानावर राहिलेल्या नोटा या पर्यायाला सात हजार 349 मते मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम विजयी झाले. त्यांना एकूण 60 हजार 13 मते मिळाली होती, तर भाजपाचे अंबरिशराव आत्राम यांना 44 हजार 555 मते मिळाली होती. या निवडणुकीतही दीपकदादा आत्राम यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना 43 हजार 22 मते, तर नोटाला पाच हजार 765 मते मिळाली होती.
मतदारसंघाची सद्यस्थिती काय?
2019 च्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांनी अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गटाने त्यांना मंत्रीही बनवले. दरम्यान, या मतदारसंघावर आता शरद पवार गटाने दावा केला आहे. तसेच धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांच्या विरोधात उमेदवाराची चाचपणी सुरू केल्याचीही माहिती आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून तरुण चेहऱ्याला संधी देणार असे सुतोवाच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केले होते. शरद पवार गटाकडून धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात प्रामुख्याने दोन नावं चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे माजी राज्यमंत्री अंबरिश आत्राम आणि धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीदेखील या नावांना दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय दृष्टिकोनातून अहेरी विधानसभेचे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे युती व आघाडीकडून ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे.
माजी आमदार दीपक आत्राम देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शर्यतीत
अहेरी विधानसभेच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या चंद्रपूर येथील बैठकीत आणि आलापल्ली येथील सभेत अहेरी विधानसभा काँग्रेस लढवणार, असा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरवातीलाच या जागेवर दावा केलेला आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः तसे सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी विधानसभेची तयारी देखील सुरू केली आहे. बीआरएस पक्षाच्या शरद पवार गटात विलीनीकरणानंतर माजी आमदार दीपक आत्राम देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शर्यतीत आहे.
हे ही वाचा :
Chandrapur Vidhan Sabha constituency: चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात कोणाचे पारडे वरचढ; भाजप की काँग्रेस,कोण बाजी मारणार?