वसंतदादांच्या नातवाला 'स्वाभिमानी'ची बॅट हाती घ्यावी लागली, हे दुर्दैव : चंद्रकांत पाटील
विशाल पाटील यांनी भाजपला ठेंगा दाखवत सांगलीमधून स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुखावलेल्या चंद्रकांत पाटलांनी मनातील खदखद बाहेर काढली.
पंढरपूर : महाराष्ट्रातील कॉंग्रेस संपत चालली आहे. कारण ज्या वसंतदादानी राज्यात कॉंग्रेस उभी केली, त्यांच्याच नातवाला सांगलीत स्वाभिमानीची बॅट हाती घ्यावी लागली अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या पंढरपूरमधील प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांपासून दुरावलेल्या परिचारक-मोहिते पाटील यांचं मनोमिलन कालच्या पंढरपूरच्या मेळाव्यात दिसून आले.
काही दिवसापासून चंद्रकांत पाटील हे वसंतदादा यांच्या नातवांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र प्रतिक पाटील यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यावरही चंद्रकांत पाटील यांनी चिकाटीने प्रयत्न सुरु ठेवले होते. अखेर विशाल पाटील यांनी भाजपला ठेंगा दाखवत सांगलीमधून स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुखावलेल्या चंद्रकांत पाटलांनी मनातील खदखद बाहेर काढली.
संजय शिंदे यांच्या गुरुने जशी निवडणुकीतून माघार घेतली तशी त्यांनी अजुनही निवडणुकीतून माघार घ्यावी असा सल्ला वजा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.
या मेळाव्याला राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सुधाकरपंत परिचारक, उत्तमराव जानकर आदी नेते उपस्थित होते. कालच्या अकलूज येथील मेळाव्यात खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या स्टेजवर होते आणि आज पंढरपूरमध्ये जेष्ठ नेते सुधाकर परिचारक भाजपच्या स्टेजवर आल्याने आता जेष्ठ मंडळीही खुल्यारितीने भाजपच्या प्रचारात उतरल्याने कार्यकर्त्यांचाही उत्साह दुणावला आहे .