(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Survey: 2024 मध्ये काँग्रेस नव्हे, भाजपची खरी लढत यांच्यासोबत; सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर
Lok Sabha Electon Survey: 2024 मध्ये भाजपला काँग्रेस नाही, तर इतर पक्षांकडून जोरदार टक्कर मिळणार आहे. जाणून घेऊया आकडेवारीनुसार, कोण देणार कडवी झुंज..?
Lok Sabha Electon Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपनं (BJP) पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनंही काम करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की, लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसशिवाय इतर पक्षांकडून कडवी टक्कर मिळणार आहे.
इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणात सर्व पक्षांचे वोट शेयर पाहिलं तर, काँग्रेस भाजपपेक्षा खूपच मागे आहे. पण इतर पक्षांबाबत बोलायचं झालं तर ते भाजपच्या बरोबरीत आहेत. सर्वेक्षणात एकूण मतांपैकी 22 टक्के मतं काँग्रेसला, तर 39-39 टक्के मतं भाजप आणि इतरांना मिळत असल्याचं दिसून आलंय.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असली, तरी मतांच्या टक्केवारीतील चढ-उतार किती फायदेशीर किंवा हानीकारक ठरू शकतात, हे भाजपला चांगलंच माहित आहे. 2014 मध्ये, भाजपच्या मतांच्या वाढीमुळे पक्ष एका झटक्यात सत्तेवर आला होता, तर पाच वर्षांपूर्वी 2009 मध्ये 200 हून अधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसच्या पदरात मात्र निराशा पडली होती. 2014 मध्ये काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या.
इथे मात्र भाजप इतरांपेक्षा सरस
दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून इतर पक्षांच्या मतांमध्ये घट होत आहे, ही भाजपसाठी दिलासादायक बाब ठरू शकते. दीड वर्षात झालेल्या तीन सर्वेक्षणांमध्ये इतर पक्षांचा आकडा 43 टक्क्यांवरून 39 टक्क्यांवर घसरला आहे. भाजपचा वोट शेअर 2 टक्क्यांनी वाढून 37 वरून 39 वर पोहोचला आहे. 2019 मध्ये इतर पक्षांना 43 टक्के मतं मिळाली होती, ज्यात वाढ झाली आणि ऑगस्ट 2021 च्या सर्वेक्षणात ती 46 टक्क्यांपर्यंत पोहोचली.
आता काँग्रेसचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे. काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी तीन सर्वेक्षणांमध्ये 2 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी 2022 मध्ये काँग्रेसची मतांची टक्केवारी 20 टक्के होती, जी ऑगस्ट 2022 मध्ये 21 टक्के आणि जानेवारी 2023 मध्ये 22 टक्के झाली आहे.
10 वर्षात भाजप आणि काँग्रेसची परिस्थिती काय?
2009 ते 2019 या दरम्यान तीन लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली, तर भाजपसाठी चांगली गोष्ट म्हणजे, त्यांच्या मतांची टक्केवारी सातत्यानं वाढत आहे. 2009 मध्ये भाजपला 18.8 टक्के मतं मिळाली होती. यानंतर 2014 च्या मोदी लाटेत पक्षाला 31.34 टक्के मतं मिळाली होती, तर मोदी लाट 2.0 मध्ये भाजपला 37.76 टक्के मतं मिळाली होती. या तीन निवडणुकांमध्ये 2009 मध्ये काँग्रेसला 28.55 टक्के मतं मिळाली होती. तर, 2014 आणि 2019 मध्ये त्यांना अनुक्रमे 19.52 आणि 19.70 टक्के मतं मिळाली होती.
2024 मध्ये देशात सरकार कोणाचं?
आज निवडणुका झाल्या तर कोणाचं सरकार बनणार? असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. लोकांनी एनडीएच्या बाजूनं बहुमत दिलं. सर्वेक्षणानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 298 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला गेल्या निवडणुकांच्या तुलनेत फायदा होताना दिसतोय. यूपीएला 153 जागा मिळू शकतात.