(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laxman Hake: रिंगणात लढायला वाघाचं काळीज लागतं, मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेताच लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभा करणार नाही, असे म्हटले. त्यावर लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली.
पुणे: निवडणुकीत एका जातीच्या बळावर जिंकणे शक्य नाहीत, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा सोमवारी सकाळी केली. विधानसभा निवडणुकीत आता फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणारे उमेदवार पाडायचे, असे जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाला गनिमी कावा म्हणत आहेत. पण रणांगणात लढायला वाघाचं काळीज लागतं. मनोज जरांगे 130 उमेदवारांना पाडायची भाषा करत होते, त्याचं काय झालं, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
मी मी नेहमी सांगत आलो होतो, मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. ते बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागत आहेत. जत्रा भरवणं सोपं असतं, पण लढणे अवघड असते. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीच्या सांगण्यावरुन प्रचार केला. मात्र, आता ओबीसी समाज एकटवल्याने मनोज जरांगे यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरुन घेतली आहे. रणांगणात लढायला वाघाचं काळीज लागतं, गनिमी काव्याचा काळ गेला, असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना लगावला.
मनोज जरांगे पाटील हा दिवसाला भूमिका बदलणारा माणूस आहे. ते मुंबईच्या वेशीवरुन माघारी परतले होते. त्यांचा राजकारण, निवडणूक याबद्दल अभ्यास नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिला आहे ते आता काम करणार नाही. ज्यांनी जरांगे यांना पाठींबा दिला होता, त्यांचा कार्यक्रम आता ओबीसी करणार, त्यांना निवडणुकीत पाडणार, ज्यांनी पत्र दिले त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
35 विधानसभा मतदारसंघांमध्ये ओबीसी समाजाचे उमेदवार देणार: लक्ष्मण हाके
जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूला असेल त्यांना आमचा पाठींबा असेल. मी पळ काढणारा नाही, तीन वाजेपर्यंत वाट पाहा. मी ओबीसी हक्क अधिकार यासाठी लढणार आहे. अशोक चव्हाण यांच्याविरोधात सभा घेतली आहे, त्यांनी ओबीसी बाबत भूमिका घेतली आहे, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. आमचे पण काही उमेदवार आहे,अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहेत, आमचे ओबीसी उमेदवार आहेत. 10 ते 12 मतदार संघात आमचे उमेदवार आहेत. काही मतदारसंघात अनेक अर्ज ओबीसी नेत्यांचे अर्ज आहेत. मराठवाड्यातील ७-८ जिल्ह्यातील आम्ही काम करत आहोत. ओबीसी 70 जागा लढणार काही 30-35 ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार आहोत, असे हाके यांनी सांगितले.
आणखी वाचा
मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही