Karnataka Elections: कर्नाटकात काँग्रेस की भाजप? उद्या निकाल; बेळगावातील निकाल दुपारी 2 वाजेपर्यंत जाहीर होणार
Karnataka Assembly Elections 2023 : बेळगावातील 18 मतदारसंघाचे निकाल उद्या, शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जाहीर होणार आहेत, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. उद्या म्हणजे शनिवारी 13 मे रोजी दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील.
कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे 13 तारखेला ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.
2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद
विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झालं आहे.
बेळगावचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत येणार
बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी, 13 मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सकाळी 6 वाजता मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हजर राहणार आहेत. 7.30 वाजता मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली स्ट्रॉंग रूम उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर 8 वाजता प्रथम पोस्टाने आलेली मते मोजली जाणार आहेत. 8.30 वाजता मतदान यंत्रातील मतमोजणी प्रारंभ होणार आहेत. मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या असून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात 29 मतमोजणीच्या फेऱ्या असणार आहेत. मतमोजणी केंद्राला निमलष्करी दल, सशस्त्र पोलीस आणि पोलीस अशी तीन पदरी सुरक्षा असणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही
कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे 13 मे रोजीच्या निकालावेळी समजेल.
ही बातमी वाचा: